३१ कौलालंपूर (हिल्टन)
२६ एप्रिल, १९७४
दिल्लीहून निघालो त्याच दिवशी दुपारी तीन वाजता येथे पोहोचलो. (दिल्ली टाईम १ पी. एम्.) वाटेत जवळ जवळ दोन तास बँकॉकमध्ये काढले.
त्या दोन तासांत विमानतळावरूनच 'अयोध्या' पहाण्यासाठी गेलो. आज ती 'अयोध्या' ओसाड आहे. काही पडलेल्या इमारतींचे आणि मंदिरांचे भग्न अवशेष जुन्या वैभवाची पुसटशी साक्ष देत आहेत.
तसे म्हटले तर पहाण्यासारखे काही नाही. नाही म्हटले तरी ४०० वर्षे हे शहर या देशाची राजधानी होते. १८ व्या शतकाच्या शेवटी ब्रह्मी सैन्याने आक्रमण करून या शहराचा विध्वंस केला. भारतापासून हजारो मैल दूर अंतरावरील ही 'अयोध्या' पहाताना हजारो वर्षांचा सांस्कृतिक संबंधांचा इतिहास मनात गर्दी करून गेला.
ए. डी. बी. च्या वार्षिक सभेचा अध्यक्ष म्हणून (चेअरमन) मी आलो असल्यामुळे स्वागत वगैरे समारंभपूर्वक झाले. त्यातून मुक्त होऊन चारचे सुमारास हिल्टनमध्ये पोहोचलो.
कौलालंपूर हे पाच लाख वस्तीचे शहर आहे. ब्रिटिश राजवटीची सर्व छाप, इमारतींचे बांधकाम, रस्त्यांची आखणी व इतर शिल्प यावरून झटकन ध्यानात येते. गेल्या दहा वीस वर्षात काही बदल झाले असणारच. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांत नवी हॉटेले मात्र बरीच झाली आहेत. आजकाल शहरांचे मोठेपण आधुनिक हॉटेल्सच्या उंच हवेल्यांवरून मापण्याची प्रथाच पडलेली दिसते.
आम्ही ज्या हॉटेलमध्ये (हिल्टन) उतरलो आहोत ते गेल्या चार महिन्यांखालीच तयार झाले. सर्वात मोठे व अत्यंत आधुनिक असे ते मानले जाते. बहुतेक सर्व देशांची प्रतिनिधीमंडळे येथेच उतरली आहेत. आम्ही सर्वजण २४ व्या मजल्यावर आहोत.
माझ्या खोलीतून शहराचे फार सुरेख दृश्य दिसते. अगदी पुण्यासारखे दिसते. डोंगराच्या उतारापर्यंत शहर पसरले आहे. घरांची शेवटची रांग बहुधा लहान लहान टेकडयांच्या कुशीत, वृक्षराजींनी झाकलेली दिसते. हॉटेलपासून जवळच विस्तृत असे 'रेसकोर्स' आहे.
उत्तम ठेवलेली, काहीशी चक्राकार, घोडयांची धावपट्टी आणि त्याच्या दोन्ही बाजूला सुरेख राखलेली व मर्यादशीर पसरलेली गवत-जमीन (लॉन) मन मोहून घेते. वेळ मिळाला की, या रेसकोर्सकडे पहात गरम चहा घेत बसणे हा येथील माझा आवडता छंदच झाला आहे.
कोण जाणे, हे रेसकोर्स पाहिले की मला पुण्याची आठवण येते. या रेसकोर्सभोवती जुन्या ब्रिटिश राजवटीत बांधलेली, वसाहती राज्यांना शोभणारे शैलीदार बंगले आहेत. त्यामुळे 'क्वीन्स गार्डन, पूना' ची याद मन भरून टाकते. पाठोपाठ रेसकोर्स रोड दिल्लीचा ताजाताजा सहवास मन उल्हसित करतो.
सकाळी लवकरच जाग आली. झुंजुमुंजु झाले होते. पंचवीस-तीस उमदी घोडी रपेटसाठी किंवा सरावासाठी मैदानावर होती. काही आली होती, किंवा येत होती. पावसाची रिमझिम चालू होती. हे सर्व पाहिले नि डोळयासमोर उभी राहिली ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांतील पुण्यातील एक पावसाळी सकाळ. आठवणींनी मनात गर्दी केली.
कितीतरी आठवणी-सुख-दु:खाच्या! आशा-निराशांच्या! नव्या भेटलेल्या व जुन्या जिव्हाळयाच्या हरवलेल्या माणसांच्या!