विदेश दर्शन - ६१

९॥ नंतर फ्लॉरेन्स-दर्शनार्थ रपेट सुरू. आमच्याबरोबर श्री. उपासनी, श्री. सोनी (चार्ज डी अफेअर्स) आणि श्री. मलहोत्रा - हिंदुस्थानचे इटलीमधील रहिवासी-व्यापारी आहेत. कोणा एका कंपनीचे प्रतिनिधी आहेत. ते मला भेटल्याची (मुंबईत) आठवण देत होते. बरे वाटले गृहस्थ. दुपारी लंचच्या वेळी त्यांची कन्या व जावई-हे इटालियन उद्योगपती आहेत-हजर होते, सुरेख जोडपे वाटले. मनमोकळे बोलणे. अकारण कृत्रिम ऐट नव्हती. स्मरणीय व्यक्ती.

'मिचेल अॅन्जेलो' ची कलाकृति पाहिली. हे गाव त्यांची जन्मभूमी व प्रथम कार्यक्षेत्र. नंतर Palaa of Pitti-हे अतिशय भव्य म्युझियम आहे. अनेक नामवंत महाचित्रकारांच्या कलाकृति अगदी खच्चून भरल्या आहेत. भरून गेले आहे. रफॅलो, रुबेन्स इत्यादींच्या इतक्या कलाकृति आहेत की, सर्व पहाता पहाता मी दिपून गेलो. म्हणजे नाही म्हटले तरी काहीसा गोंधळून गेलो म्हटले तरी चालेल.

कॅथेड्रलमध्ये या शहरातील प्रख्यात व्यक्तींचे दफन झालेले आहे. मायलेक अंजेलो, मॅकीव्हिली, गॅलिलिओ, केवढी वजनदार यादी आहे नाही? आमचा जो गाईड होता, तो सांगत होता की, मॅकीव्हिलीचा वारसदार त्याच्या पत्त्याच्या खेळातील साथीदार आहे. तोच मॅकीव्हिलीचा शेवटचा वंशज आहे. कारण त्याला मूलबाळ नाही. तसा वंशज राहणार नाही हे त्याचे खरे आहे, पण जगभर राजकारणात पसरलेले एकाहून एक चढ आणि कदाचित त्यालाहि मागे टाकणारे असे कित्येकांचे वंशज आहेत - त्यांचे काय?

दुपारी २॥ वाजता निघालो. तीन तासांत रोमला पोहोचलो. २०० मैल अंतर असावे. सुंदर रस्ता-सुंदर परिसर. अधून-मधून पावसाचे शिंतोडे येत होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूस चार-दोन मैलांच्या अंतरावर दिसणारी धूसर डोंगर-रांग - नाही म्हटले तरी मुंबई-पुण्याच्या प्रवासाची आठवण झाली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org