२८ फ्लॉरेन्स (इटली)
१३ जानेवारी (रात्री ९-३०), १९७४
भारतीय वेळ १४ जानेवारी - संक्रांति, १९७४
जानेवारी बाराच्या मध्यरात्रीनंतर म्हणजे १३च्या प्रारंभी - दीड वाजता मुंबईहून निघालो.
मुंबईचे सर्व वातावरण एकूण अस्वस्थ करणारे होते. निघण्यापूर्वी श्री. वसंतराव नाईक भेटले. ते असतानाच पी. एम्. ला फोन करून त्यांच्या भेटीबाबत माझा सल्ला काय आहे तो सांगितला. आता निर्णय त्यांचा. पण जो घेतील तो योग्यच असेल.
उद्याची निवडणूक, जे मी ऐकले त्यावरून, जिंकेल असे वाटत नाही. मतदान फारच कमी झाल्यावर पराभवातही अंतर फार कमी पडावे असाही एक अंदाज दिला जातो. All tactics and no principled strategy. परिणाम असेच भोगावे लागतात.
उगीच विचार करीत विमानात झोपून राहिलो. केव्हा तरी झोप लागली. कुवेतमध्ये जाग आली. पुन्हा एकदा कॉफी घेऊन झोपी गेलो.
दोन तासांनी जाग आली ती आलीच. अगदी वेळेवर रोमवर विमान घिरटया घालू लागले. वैमानिकाचा आवाज आला की, खाली दाट धुके आहे. तासभर इकडे तिकडे भटकावे लागेल.
काहीशा कमी उंचीवर भटकंती सुरू झाली. खाली कधी दाट डोंगराळ प्रदेश, कधी कधी त्यांच्या उंच टेकडया बर्फाच्छादित दिसत होत्या तर कधी छोटी छोटी तळी मंद चंद्रप्रकाशात चमकून जात. तासाभराने पुन्हा वैमनिकाचा आवाज-अर्धा तास आणखीन् थांबावे लागेल. नच जमले तर सरळ पॅरिसला जाऊ.
मजा वाटली. रोमच्याऐवजी आजचा दिवस पॅरिसमध्ये जाणार तर – सर्व कामाचा खेळखंडोबा! काही न करता उगीच दुसऱ्या विमानाची वाट पहात, पॅरिसच्या विमानतळावर बसले आहेत आपले! परंतु ते घडले नाही. दीड तासाच्या भ्रमणानंतर रोमच्या विमानपट्टीवर आम्ही एकदाचे उतरलो.
रोममध्ये प्रवेश करताच एक प्रकारचा शुकशुकाट दिसला. कारण समजले की पेट्रोलचा वापर रविवारी व इतर सुट्टयांचे दिवशी बंद! दुकाने बंद. पेट्रोल-पंप बंद, क्वचित् टॅक्सीज् व बसेस् चालू दिसल्या. स्त्रिया, पुरुष, मुले सायकलीवरून रपेट करताना दिसली.
ग्रँड हॉटेलवर पोहोचलो. जुन्या राजवाडयाच्या स्टाइलवर हे हॉटेल आहे. घाईघाईने दाढी, स्नान केले. आय. एम्. एफ्. वरचे आमचे एक्स डायरेक्टर श्री. प्रसाद अणि डॉ. मनमोहन वाट पहात होते. तास दीडतास त्यांच्याशी C 20, आणि G 24 सभांतील अजेंडाविषयी प्राथमिक चर्चा केली. ११॥ वाजता असीसी आणि फ्लॉरेन्सच्या सफरीवर निघालो.