विदेश दर्शन - ५२

२२ वॉशिंग्टन

३० जुलै, १९७३

दिल्लीहून निघाल्यानंतर २०-२१ तासांनी लंडनला पोहोचलो. वाटेत बेरूत आणि फ्रँकफर्ट मध्ये तीन तास फुकट गेले. त्यामुळे लंडनला मी अगदी थकून गेलो होतो. 'सेव्हॉय' मध्ये पोहोचल्यानंतर सरळ झोपी गेलो.

संध्याकाळी अॅक्टिंग हाय-कमिशनर सात वाजता येणार होते. म्हणून उठून कसातरी तयार झालो. संध्याकाळचे जेवण घेत असताना श्री. नामदेवराव मते यांची नातेवाईक मुलगी-एअरइंडियामध्ये असणारी भेटावयास आली. त्यांची तक्रार ऐकून घेतली.

श्री. शरद उपासनी यांनी लहान सहान गोष्टींत खूप काळजी घेतली. त्या दिवशी विश्रांती पूर्ण मिळाली. दुसऱ्या दिवशी ९ वाजता पुस्तकांच्या दुकानात चक्कर मारली. काही काही पुस्तके घेण्याचा मोह होत होता. परंतु साधनांची कमतरता होती. नवी नवी पुस्तके डोळयांनी पाहिली. जर्मनीच्या नोबल प्राइझ विजेत्या लेखकाची नवी कादंबरी खरेदी केली आणि विमानतळाकडे प्रयाण केले. कारण पॅन-अमेरिकनचे विमान साडेअकरा वाजता वॉशिंग्टनसाठी निघणार होते.

विमानतळावर वेळेत पोहोचलो पण विमान प्रत्यक्ष दीड तास उशीरा निघाले. हा प्रवास संपूर्ण दिवसाचा असल्यामुळे बिनत्रासाचा झाला. 'C 20' मीटिंगसाठी आवश्यक असलेले सर्व महत्त्वाचे कागदपत्र वाचावयाचे होते. सात-आठ तासांचा हा प्रवास या कामासाठी फारच उपयोगी पडला.

वॉशिंग्टनच्या २॥ वाजता येथे पोहोचलो. भारताचे नवे राजदूत श्री कौल (मॉस्कोला गेलो होतो तेव्हा ते तेथे राजदूत होते ) आणि इतर मंडळी भेटली.

राजदूतावासामध्ये पोहोचल्यानंतर थोडी विश्रांती घेतली व स्थानिक वृत्तपत्रे पाहिली. सर्व वृत्तपत्रे वॉटरगेट प्रकरणाच्या मथळयांनी व तपशीलवार मजकुरांनी भरून गेली होती. सिनेटच्या चौकशी-समिती-समोर निक्सनच्या निकट सत्ताधारी वर्तुळातील प्रमुख लोकांच्या साक्षी चालू आहेत. त्यातून जी हकीगत बाहेर येत आहे त्यामुळे सबंध अमेरिकन राष्ट्र चकित झाले आहे. वृत्तपत्रे, रेडिओ, टेलिव्हिजन ही सर्व माध्यमे याच एका विषयाने भरून गेली आहेत. लहानापासून मोठयांपर्यंत हा एकच विषय आहे.

काल रात्री सिलोन एम्बसीमध्ये फंडाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. स्वाइट्झर यांना निरोपाचे जेवण होते. तेथे श्री. मॅक्नामाराही भेटले. आम्ही जवळ जवळ एक तासभर बाजूला बसून या वॉटरगेटसंबंधी बोलत होतो.

श्री मॅक्नामारा फार मोकळेपणाने बोलत होते. ते दु:खी होते. कारण अमेरिकन राजकीय जीवन इतके मलीन झाले आहे की, अमेरिकेच्या राजकीय जीवनावर याचे लांबवर परिणाम होणार आहेत असे त्यांना वाटते. त्यांतल्या त्यात चांगली गोष्ट त्यांच्या मते- एवढीच की, हे सर्व प्रकरण प्रकाशांत आले. मी त्यांना काही मूलभूत प्रश्न विचारले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org