तो गेली ६-८ वर्षे पार्लमेंटचा सभासद आहे. त्याच्या मतदार संघात साठ हजार लोकसंख्या आहे. माझ्या मतदारसंघाची लोकसंख्या कमीत कमी ६-७ लाख असेल असे मी म्हटले तेव्हा तो थोडा चकितच झाला. दिल्लीपासून साधारणत: एक हजार मैलांवर दूर माझा मतदार संघ आहे हे सांगितल्यावर तर तो सर्दच झाला. मतदार-संघाशी घनिष्ट संबंध ठेवणे कसे शक्य होते - विशेषत: मंत्रिपदावर राहून संपर्क ठेवणे जमते का असे त्याने विचारले. मी म्हटले, अजून लोकांची कृपा आहे म्हणून जमते.
परंतु ज्या तऱ्हेने इंग्लंडमध्ये ते मतदारसंघाशी संपर्क ठेवतात तसा निदान मी तरी ठेवू शकलो नाही, हे मी त्याचेजवळ कबूल केले.
लंडनपासून ६०-७० मैलांवर त्याचा मतदार-संघ आहे. मतदार लहान-सहान सर्व कामे घेऊन येतात. सामान्यत: सर्व सुखी शेतकरी आहेत. तसे म्हटले तरी लहानच. ३५-४० एकरांची शेती असते. परंतु एक कुटुंब सुखाने राहू शकते असे तो म्हणाला.
पण सर्वांत अश्चर्याची गोष्ट त्याने सांगितली ती अशी - त्याच्या मतदार-संघातील सर्व, वंशदृष्टया, इंग्लंडमधील इतर लोकांपेक्षा अलग आहेत. त्यांची बोलीही वेगळी आहे. अजून इंग्लंडच्या सर्वसामान्य जीवनप्रवाहाशी एकरूप न झालेला हा समाज आहे.
दूर राहून हे सर्व बारकावे आपल्याला समजत नाहीत. अॅंग्लो सॅक्सन्सचा हल्ला झाला तेव्हा त्याचे हे लोक मध्य इंग्लंडमधून काढून लावले. तेथून ते समुद्रकिना-याशी जाऊन आज कित्येक शतके तेथेच शेती करीत राहिले आहेत.
त्यांचे लग्नसंबंधही त्यांनी आपल्यापुरतेच मर्यादित आणि बंधनात परवा परवापर्यंत ठेवले होते. काही प्रमाणात आजही तीच प्रथा आहे. एक प्रकारची जातपातच म्हणाना! त्याने स्वत: मात्र एका युगोस्लाव्हियन युवतीशी विवाह केला आहे. याचा त्याने अभिमानाने उल्लेख केला. खाण्यानंतर, ओठावर व डोळयांत खेळकर हास्य असलेल्या एका सुन्दर तरुणीशी 'ही माझी पत्नी' म्हणून ओळखही करून दिली. असा हा आमचा हँप्टन राजवाडयावरील खाना आरामात पार पडला.