१७ वॉशिंग्टन
२५ सप्टेंबर, १९७२
वॉशिंग्टनहून लिहितो आहे. लंडनमध्ये शेवटचे तीन दिवस, एकदा परिषदेचे काम सुरू झाल्यानंतर इतक्या गर्दीचे व धावपळीचे गेले की, निवांतपणे बसून लिहिणे शक्य झाले नाही.
अर्थमंत्र्यांच्या या परिषदेत बरेच नवे चेहरे दिसले. हे खातेच असे आहे की, तेथे फार दिवस राहणे अवघड आहे, असे अनेकांनी बोलून दाखविले. जुन्यांच्या गाठीभेटींनी आनंद वाटला. नव्यांचा नवेपणा जाणवेल अशा त-हेने ते वागत होते.
ही परिषद म्हणजे वॉशिंग्टनच्या (I. M. F)* परिषदेची रंगीत तालीमच म्हटली पाहिजे. अनेक गोष्टींवर बहुतेकांचे सहमत असल्याचे स्पष्ट झाले. मला वाटते, या परिषदेचा हाच सर्वांत मोठा फायदा म्हटला पाहिजे.
या सर्व गडबडीत मी दोन नाटके पाहिली. लंडनची रंगभूमी हे माझे सर्वात मोठे आकर्षण आहे. दोन्ही नाटके अगदी वेगवेगळया स्वरूपाची पण रंगतदार होती.
१) The man आणि २) My father knew Lloyd George.
अभिनयातील सहजता, आधुनिक तंत्रामुळे आलेली वास्तवता, कथेतील स्वाभाविकता, - नाटकाचे अंक दोन. दोन अंकांत सर्व मिळून चार प्रवेश. दोन अडीच तासांत सर्व काही संपते. एक नवा आनंद घेऊन प्रेक्षक बाहेर पडतो. कित्येक नाटके दोन दोन वर्षे सतत चालली आहेत. या रंगभूमीला पल्लेदार इतिहास आहे. काळाने आलेली परिपक्वता आहे. कलाकारांची जाणीव आणि व्यासंग या सर्व गोष्टींनी नाटयकला येथे सदा बहरलेली असते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
* International Monetary Fund (I.M.F.) परिशिष्ट पहा.
------------------------------------------------------------------------------------------------------
कॉमनवेल्थ मिनिस्टर्सना श्री. बार्बर (इंग्लंडचे अर्थमंत्रि) यांनी हॅम्टन कोर्टमध्ये खाना दिला. खाना महत्त्वाचा नव्हता. हॅम्टन कोर्ट महत्त्वाचे होते.
लंडनच्या बाहेर २०-२२ मैलांवरील ८ व्या हेन्रीचा हा राजवाडा. एक ऐतिहासिक वास्तू म्हणून प्रवाशांचे आकर्षण आहे. पंधराव्या शतकातील ८ वे हेन्री म्हणजे एक विलक्षण प्रकरण होते. अनेक लग्ने केली. अनेकांच्या मिळकती हडपल्या. हँप्टन कोर्ट त्यापैकीच. (Col. Woolsay) म्हणून त्यांचे हस्तक एक धर्माधिकारी होते. त्यांनी तो स्वत:साठी बांधला होता. राजाची लहर लागली आणि ते मर्जीतून उतरताच, दडपण आणून वास्तू आपलीशी केली. मोठमोठी आणि लागोपाठ अशी तीन प्रांगणे (court-yards), एक कलापूर्ण दिवाणखाना, जुनी ५०० वर्षांपूर्वीची अजूनही रेखीवपणे राखलेली सुंदर बाग, जुन्या चित्रकारांनी काढलेल्या कलाकृति आणि जुन्या शस्त्रांनी सजविलेल्या राजवाडयाच्या भिंती, ही सर्व मला वैशिष्टयपूर्ण वाटली.
या खान्यामध्ये श्री. Knoff म्हणून अर्थखात्याचे राज्यमंत्री माझ्या शेजारी बसले होते. एक मजेदार नवी ओळख म्हणूनच उल्लेख करतो आहे.
सरकारी कामकाजाच्या गोष्टी यांच्याशी बोलण्यात मला फारसा रस नव्हता. म्हणून इतरच गोष्टी निघाल्या. त्याच्या चार पाच पिढया हिंदुस्थानात ब्रिटिश सैन्यात अधिकारीपदावरच काम करीत होत्या. याचा उल्लेख करण्याने मला अवघड वाटेल म्हणून तो ते टाळीत होता. मी म्हटले तो आता जुना इतिहास झाला आहे. आज तशी वैयक्तिक कटुता आमच्यात राहिलेली नाही. तेव्हा स्वारी कुठे खुलली आणि मोकळेपणाने बोलू लागली.