१६ लंडन
२० सप्टेंबर, १९७२.
येथे पोहोचून दोन दिवस झाले. जम्बो जेटचा प्रवास तसा सुखकर झाला. का कोण जाणे हे जाडजूड हत्तीसारखे प्रचंड विमान मला आवडत नाही हे खरे.
गडबडीच्या वार्ता होत्या. परंतु बेरूतला आम्ही उतरलो. बेरूत ते लंडन श्री. महाजन म्हणून विमानाचे कॅप्टन आले. साहजिकच आपलेपणाने बोलले. वागले.
जम्बोचे टेक्-ऑफ व लँडिंग ही दोन्ही त्यांनी आग्रहपूर्वक दाखविली. मधल्या काळात थोडावेळ आपल्या एअर-इंडियाच्या कारभाराबाबत काही कहाण्याही सांगितल्या. राष्ट्रीयकृत संस्थांमध्ये संस्थानिकांसारखी नोकरशाही कशी वाढते आहे, त्याची काही नमुनेदार उदाहरणेही दिली.
मुंबईच्या एअर-इंडियाच्या प्रमुख कचेरीचा एक संपूर्ण मजला दोन-तीन ऑफिसरच्या कचेरीसाठी कसा वापरला जातो वगैरे गोष्टी ऐकून आश्चर्य वाटले. त्याच्या तपशीलात जाण्याचे मी ठरविले आहे. याच संदर्भात त्यांनी स्टेट बँकेचाही उल्लेख केला.
फ्रँकफर्ट-पॅरिस मार्गे थांबत थांबत आलो. मात्र या वेळी विमान सोडून बाहेर जाता आले नाही. म्यूनिक आलेंपिकच्या कत्तलीपासून बंदोबस्त फारच कडक केला आहे.
लंडनच्या गेल्या आठ वर्षांत अनेक फे-या झाल्या. परंतु हॉटेलमधला लांबलचक मुक्काम हाच पाहिला. इंग्लिश स्टाइलचे हे जुने व प्रसिध्द हॉटेल आहे (Claridges). सरकारी व्यवस्था उत्तम आहे. तूही सोबतीला असणार या कल्पनेने त्यांनी सर्व व्यवस्था केली होती...पण...कशी आहे तुझी प्रकृती ? उगीच माझी काळजी करून प्रकृतीस त्रास करून घेऊ नकोस.
गेल्या दोन दिवसांत दोन वेगवेगळया ठिकाणी लंडनच्या बाहेर जाऊन आलो. पहिल्या दिवशी कँटरबरीच्या इतिहासप्रसिध्द कॅथिड्रलला भेट दिली. श्री. अप्पासाहेब पंत साथीला होते.
इंग्लडमधील प्रत्येक गोष्टीला काही ना काही इतिहास असतोच, असे म्हटले तरी चालेल. मग हे तर इतिहासप्रसिध्द स्थान ! १२ व्या शतकापासून १६ व्या शतकापर्यंत येथे अनेक घडामोडी झालेल्या आहेत.
धर्मकारण व राजकारण या दोन्ही क्षेत्रांतील संघर्ष व त्यांचे अवशेष आणि स्मृति येथे पहावयास सापडतात. याचे बांधकाम दोन-तीन शतकभर वेगवेगळया स्थापत्यप्रणालीप्रमाणे झाल्यामुळे ते एकजिनसी दिसत नाही. परंतु त्याची विविधता हे त्याचे सौंदर्य म्हटले पाहिजे.
इंग्लंडच्या इतिहासात जसे अनेक राजे व राण्या यांचे वध झालेत त्याचप्रमाणे प्रमुख धर्मगुरूही (आर्च-बिशप) बरेचसे मारले गेले आहेत. या विस्तीर्ण व विशाल वास्तूमध्ये हिंडत असतांना इतिहासाच्या दालनांतून प्रत्यक्ष फेरफटका करीत आहे अशी भावना होते. एक वृध्द धर्माधिकारी आमच्या सोबतीला माहिती देण्यासाठी होते. विद्वत्ता, आतिथ्य, नर्मविनोद याचा सुंदर संगम या माणसात दिसला.