विदेश दर्शन - ३४

१२ जिनिव्हा
१९ एप्रिल, १९७२

मुंबईहून बरोबर एक वाजता (रात्री) निघालो. श्री. वसंतराव नाईक सहकुटुंब, श्री. वसंतरावदादा, दादासाहेब जगताप, शरद पवार, बाबासाहेब मोरे आदि विमानतळावर हजर होते.

रात्री ८ तास झोप मिळाली. इथल्या वेळेप्रमाणे ७-१० वाजता (म्हणजे आपले ११-११॥ असावेत) पोहोचलो. श्री. राम प्रधान व श्री. बॅनर्जी-ऍम्बॅसिडर-स्वागतासाठी हजर होते.

छोटेसे पण सुंदर शहर आहे. माझ्या हॉटेलरूममधून जवळ जवळ शहराचा प्रमुख भाग दृष्टिपथात येतो आहे. जिनिव्हाचे प्रसिध्द सरोवर व आसपासची वस्ती ही कशी सुरेख वाटतात. शहराच्या पूर्वेकडे असणा-या उंच डोंगराची पार्श्वभूमी या शहराचे एक वैशिष्टय दिसते. येथून दुपारी २ वाजता व्हिएन्नास प्रयाण आहे.

१३ व्हिएन्ना
२० एप्रिल, १९७२

जिनिव्हामध्ये दोन-तीन तास शहरामध्ये मोटारीतून भटकलो. हे शहर तसे फार लहान आहे. दोन लाखांची वस्ती. परंतु जवळ-जवळ दोनशेच्यावर आंतरराष्ट्रीय संस्थांची केंद्रीय व इतर दप्तरे इथे असल्यामुळे याचे एक प्रकारे महत्त्व आहे.

या शहराचे खरे सौंदर्य सरोवर व आसपासची विस्कटलेली वस्ती यात आहे. या शहराच्या तीन्ही बाजूला फ्रान्सचा मुलूख आहे. आम्ही यू. एन्. च्या प्रमुख कचेरीच्या आवारात जाऊन आलो. जुन्या 'लीग' ऑफ नेशन्स' ची ही कचेरी होती. ऐसपैस राजवाडाच आहे. समोर पृथ्वीचा एक सोनेरी विशाल गोल आहे. आकर्षक वाटला.

जिनिव्हाचे हे सरोवर जवळ-जवळ ८० किलोमीटर आहे. खरे म्हणजे आल्पसमधून आलेल्या नदीचे हे सरोवर झाले असून त्यांतून ती नदी पुढे वाहात जाते. श्रीनगरच्या डाल लेकसारखेच हे प्रकरण आहे. झेलम वाहात येऊन श्रीनगरच्या मैदानात डाल सरोवर बनते व त्यातून पुढे झेलम पुनश्च आपला प्रवास पुढे सुरू करते.

या सरोवराच्या काठी अमेरिका व इतर संपन्न देशांतील शौकिन धनपती, फिल्मी दुनियेतील नामांकित नटनटया व श्रीमंतीत लोळणारे यशस्वी लेखक आपापली निवासस्थाने बांधून वर्षातील बराचसा काळ येथे काढतात. निर्धास्त संपत्ती साठविण्यासाठी या देशाचे कायदेकानून सोयीस्कर असल्यामुळे हे शक्य होते असे सांगण्यात येते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org