११ नॅसॉ-बहामा
२४२५ सप्टेंबर, १९७१
२० सप्टेंबरला माझी येथील बँकिंगच्या क्षेत्रातील प्रमुखांशी जी बोलणी होती ती पुरी करून तारीख २१ ला सकाळी लंडनला निघालो. लंडनच्या विमानतळावरच थोडा वेळ थांबून लगेच पुढे न्यूयॉर्कला निघावयाचा पहिला विचार सोडून द्यावा लागला. कारण एअर इंडियाचे विमानच मुळी मुंबईहून उशीरा निघाले. त्यामुळे तीन चार तास मोकळे सापडले.
श्री. अप्पासाहेब पंत (हायकमिशनर) विमानतळावर आले होते. ते म्हणाले, 'घरीच चला आणि जेवण करून परत या.' बरेच दिवसांनी त्यांची भेट झाली होती. या घरी मी १९६४ साली १०-१२ दिवस राहिलो होतो. सौ. नलीनीबाई पंत -तुझी त्यांची एकच वेळ भेट झाली होती असं त्या म्हणाल्या - तुला बरोबर का आणले नाही असे विचारीत होत्या.
दुपारी ३ वाजता लंडनहून निघून न्यूर्याकला ५ वाजता पोहोचलो. (न्यूयॉर्क टाइम) वेळेचा एवढा गोंधळ आणि जेवणे किती याला मर्यादा नाही. परत आल्यानंतर मला ओळीने आठ दिवस उपवास केले पाहिजेत. बरेच महिने प्रयत्न करून उतरलेले वजन बरेच वाढेल असे दिसते.
एक रात्र न्यूयॉर्कला काढून दुसरे दिवशी सकाळी बहामा बेटांची राजधानी नॅसॉ येथे पोहोचलो. पॅरॉडाइझ बेटावरील पॅरॉडाइझ हॉटेलमध्ये आमची व्यवस्था आहे. कॉन्फरन्सही याच हॉटेलमध्ये आहे.
बहामा हा एक नवा देश बनला आहे. जवळ जवळ लहान-मोठया ७०० बेटांची शेकडो मैलांवर पसरलेली ही एक बेटांची रांगच आहे. अमेरिका व क्युबाच्या दरम्यान अटलांटिक सागरामध्ये याचे महत्त्वाचे स्थान आहे.
या देशाची एकूण लोकसंख्या एक लाख पासष्ट हजार आहे. म्हणजे अहमदनगर शहराची कदाचित जेवढी लोकसंख्या असेल तेवढीच या देशाची आहे. या बेटांचा इतिहासही अगदी नवा. पाश्चिमात्य देशांच्या धाडसी व आक्रमक इतिहासाचे एक पान म्हणजे या देशाचा इतिहास आहे म्हटले तरी चालेल.
कोलंबस अमेरिकेच्या शोधात, वाटेवर येथे थांबला. मूळचे काही आदीवासी येथे होते. पण त्यांची वासलात नेहमीप्रमाणे लागली. पुढे स्पॅनिश आले व गेले. नंतर वसाहतीसाठी काही आयरिश व इंग्लिश आले. अमेरिकन स्वातंत्र्यलढयाच्या वेळी काही परस्थ कुटुंबे येथे आली व कापसाची लागवड आणि इतर मळे त्यांनी येथे केले. या सर्व कामासाठी पश्चिम आफ्रिकेतून अनेक काळे लोक गुलाम म्हणून आले. याच काळया लोकांचा आज हा खरा देश झाला आहे.
अमेरिकेमध्ये प्रोहिबिशन सुरू होते तेव्हा या देशामध्ये चोरीच्या दारूच्या धंद्यामुळे व त्याचप्रमाणे समुद्रावरील चाचेगिरीमुळे बरीच सुबत्ता आली होती. ख-या अर्थाने येथे अराजकच होते. आता हळूहळू स्वायत्तता व स्वातंत्र्य असे त्याचे मार्गक्रमण सुरू आहे. या छोटेखानी देशाला नॅशनल असेंब्ली आहे. पूर्ण मंत्रिमंडळ आहे. सर्व जामानिमा मोठया देशांचा आहे.