विदेश दर्शन - २६

९ कोपनहेगन
२५ सप्टेंबर, १९७०

कोपनहेगनला येऊन चार दिवस झाले. या शहराबाबत वा या देशासंबंधी अजून मी काहीच लिहिलेले नाही.

येथे पोहोचलो त्या रात्रीच वेळ होता म्हणून बंदरभागात चक्कर मारली. सुरेख संध्याकाळ होती. रात्री रेस्टाराँमध्ये (अॅंबॅसिडर श्री. थडाणीहि बरोबर होते.) जेवण घेतले. दुसरे दिवशी सकाळी २५-३० मैलांवर असलेले (Harl for) हे इंग्रजी नामांतर आहे- एक म्युझियम पाहिले.

व्हायकिंग राजाच्या कारकीर्दीत बंदराच्या तोंडाशी मुद्दाम बुडविलेली पाच जहाजे जवळ-जवळ ८००-९०० वर्षांनी वर काढली आहेत. त्यासंबंधी संशोधन चालू आहे.

डेन्मार्क हा अगदी छोटा देश आहे. परंतु दर्यावर्दी म्हणून फार मशहूर आहे. जगाच्या उत्तरेच्या बाजूला असलेला स्कँडेनेव्हियन देशांचा हा पुंजका. भूगोल, हवामान आणि इतर नैसर्गिक साधने यांमुळे काहीसा अडचणीत आहे. परंतु या अडचणींतून व अडचणींमुळेही काही नवी शक्ति-साधना करू शकला आहे. त्यांचा इतिहास यामुळे अनेक पराक्रमांच्या कथांनी भरलेला आहे.

अमेरिका, ९ व्या शतकात या देशातील धाडशी दर्यावदाअनी प्रथम शोधली. आर्थिक जीवन पूर्वी फक्त शेतीवरच अवलंबून होते. परंतु आज मात्र उत्तम शेती, दुभती व अन्य जनावरे यांची उत्कृष्ट निपज व जोपासना, याच बरोबर त्यांनी उद्योगधंद्याचीही बरीच वाढ केली आहे. जहाज-बांधणीच्या क्षेत्रात त्यांनी उत्तमच प्रगति केली आहे.

६५ वयाच्या वर सर्व लोकांना बांधीव पेन्शन दिले जाते. बेकार तरुणांबाबत तशीच व्यवस्था आहे. हल्ली येथे संमिश्र सरकार आहे. (Coalition Govt.) १९६८ पासून हे नवे चित्र निर्माण झाले असून प्रयोग अजून फसलेला नाही.

२० तारखेला ठीक ९ वाजता वर्ल्ड बँकेच्या, वार्षिक सभेच्या कामास सुरुवात झाली. एका मोठया साध्या पण आधुनिक सजावटीनं सजलेल्या सभागृहामध्ये सर्व देशविदेशांचे प्रतिनिधी हजर होते. डेन्मार्कचे राजे यांनी प्रथम भाषण करून सुरुवात करून दिली व ते निघून गेले. दोघेही राजा-राणी साध्या वेषांत आले होते. सभेच्या अध्यक्षांचे, प्रथम, परिस्थितीचे समालोचन करणारे छान भाषण झाले. भाषण चालू असता इतर भाषांत (फ्रेंच, इंग्लिश, स्पॅनिश) त्याचे भाषांतर करण्याची अप्रतिम सोय होती.

खरी महत्त्वाची भाषणे झाली ती श्री. स्वाइट्झर (मॅनेजिंग डायरेक्टर, आय्.एम्.एफ्.) आणि बँकेचे अध्यक्ष श्री. मॅक्नामारा यांची. बँकेपुढच्या प्रमुख समस्यांबाबत त्यांचे काय मत आहे याचा काहीसा अंदाज, या भाषणांवरून लागणार असल्याने सर्वजण प्राण कानात ओतून भाषणे ऐकत होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org