विदेश दर्शन - २१

                                          दर्शन दुसरे

                               अर्थमंत्री (जून १९७० ते ऑक्टोबर १९७४)
---------------------------------------------------
६ निकोसिया-सायप्रस

१६ सप्टेंबर, १९७०

आता निकोसियामध्ये ५-४५ वाजलेत. म्हणजे मुंबईचे १६ तारखेचे रात्रीचे ९-१५ वाजले असतील.

काल दुपारी बेरुतमध्ये पोहोचलो. पाच एक तास तेथील एका हॉटेलमध्ये काढले. समुद्रकिनाऱ्यावर असलेले एक आधुनिक थाटाचे राजधानीचे शहर आहे (लेबनॉन). येथील राजभाषा अरबी आहे.

किनाऱ्यालगतची घरे सोडली तर इतर सर्व शहर वेगवेगळया टेकडयांवर वसलेले आहे. मी या शहरातून एक तासभर मोटारीतून भटकून आलो. मलबारहिलच्या बाजूला हिंडताना जसे दिसते वा भासते तसाच काहीसा अनुभव येतो. उन्हाळी हवा मुंबईसारखी आहे. परंतु या हवेत या छोटेखानी देशातील श्रीमंत लोक व इतर धनिक देशांतील धनवान प्रवासी येथे चैनीसाठी येतात.

विमाने पळविण्याच्या नव्या तंत्राने वातावरण बरेच अस्वस्थ दिसले. प्रवाशांच्या आवश्यक त्या झडत्या घेताना दिसले. अर्थातच आम्हाला या दिव्यातून जावे लागले नाही हे वेगळे. बेरुत ते निकोसिया या प्रवासात मात्र आमच्या छोटया बॅग्सही आमच्याजवळ ठेवू दिल्या नाहीत. कारण अशा बॅगस्मधून विमानपळवे आपली हत्यारे ठेवीत असतात. आमच्या बाबतीतही ही काळजी घेतली ही मात्र विनोदी बाब होती असे वाटले.

खरा विनोद तर पुढेच होता. विमान निकोसियाच्या विमानतळावर उतरण्यापूर्वी विमान-सुंदरीने आपल्या नाजुक आवाजात ज्या सूचना दिल्या त्यामध्ये तिने आम्हाला आवर्जून सांगितले की तुमच्या हॅण्डबॅग्स हातात घेऊन तयार व्हा! पण त्या होत्या कोठे आमच्याजवळ? सगळीकडे त्यामुळे हास्याची चांगलीच खसखस पिकली.

लेबनॉनमध्ये एक अजब गोष्ट ऐकली. हल्ली तेथे सरकारच नाही. परंतु राज्यकारभार मात्र चालू आहे. तेथील पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी मंत्र्यांनी सात महिन्यांपूर्वीच राजिनामे दिले आहेत. प्रेसिडेंटने ते स्वीकारले नाहीत आणि मंत्रिमंडळाचे सभासद कचेरीत जात नाहीत, किंवा कोणत्याच कागदपत्रावर सह्या करीत नाहीत. मोठी विलक्षण परिस्थिती आहे.

काल संध्याकाळी ६॥ वाजता या शहरातील 'Ledra Palace' या हॉटेलमध्ये पोहोचलो. उत्तम व्यवस्था आहे. वेळातील अंतरामुळे सर्वच गोंधळ होतो आहे. मात्र काल रात्री भरपूर झोप काढली, त्यामुळे आज मी प्रसन्न आहे.

सकाळी दोन-तीन तास मोटारीतून प्रवास करून ३०-४० मैलांवर असलेला (समुद्रकिनाऱ्यावरील) एक पुराणा जलदुर्ग पाहून आलो. या बेटावर जी थोडीफार बरी शेती आहे ती बहुधा उत्तरेला असलेले डोंगर आणि समुद्र यांच्यामधील छोटेखानी पट्टयामध्ये आहे. उत्तर किनाऱ्यापासून तुर्कस्तान फक्त ४० मैल दूर आहे. सकाळच्या धूसर सूर्यप्रकाशात तुर्कस्तानच्या पर्वतराजीचे आकार अस्पष्टपणे का होईना दृष्टिमान होत होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org