विदेश दर्शन - २०

५ ताश्कंद

६ जानेवारी, १९६६

गेले दोन दिवस नित्याप्रमाणे नवीन वातावरणाशी समरस होण्याच्या प्रयत्नात गेले. चर्चा, संमेलने चालूच होती. परंतु त्यांचे बरेच स्वरूप औपचारिक होते.

काल दुपारपासून मूळ मुद्यांना हात घातला गेला आहे. आज आणि उद्या हे या चर्चेतील महत्त्वाचे दिवस आहेत.

प्रेसिडेंट आयूब आणि भूत्तो या दोन्ही व्यक्तींना मी प्रथमच भेटलो. प्रे. आयूबला व्यक्तिमत्व आहे. उंचापुरा पठाण. चेहेऱ्यावर नाटकी हास्य भरपूर. बोलणेही अघळपघळ आणि गोड. माणूस प्रामाणिक नाही वाटत. चलाख वाटतो. त्याच्या शब्दांवर भरवसा ठेवणे अवघड आहे- नव्हे धोक्याचे आहे!

भूत्तोशी काही बोलण्याचा प्रसंग आलेला नव्हता. पहिले दोन दिवस थंड बसून होता. काल दुपारी पहिला सामना झाला. बोलण्यावागण्यात करेक्ट होता. आपले म्हणणे स्पष्ट शब्दांत, काही आडपडदा न ठेवता त्याने मांडले.

पाकिस्तानचे विचार आणि हेतू समजण्यासाठी भूत्तोचे शब्द आणि विचार हेच आम्हाला मार्गदर्शक व उपयोगी ठरतील. प्रे. आयूबच्या insincere शब्दांवर अधिक भरवसा ठेवता येणार नाही.

चेअरमन कोसिजिन किती प्रमाणात स्पष्ट भूमिका घेतील याच्यावर आता या बैठकीचे भविष्य आहे असे माझे मत आहे. पाहू या!

आमचा प्रवास तसा सुखकर झाला. बरोबर ९-४५ ला (भारत टाइम) निघालो आणि ४-४५ ला (ताश्कंद टाइम) पोहोचलो.

बडोद्यावरून विमान किनाऱ्याकडे वळले. समुद्रावर आल्यावर मात्र विमानाने इतकी आदळ-आपट केली की काही सोय नव्हती! आकाश निरभ्र होते, वादळ नव्हते आणि विमान तर इतके हलले की विचारू नये! मला तर नवल वाटत होते.

पायलटला विचारता त्याने सांगितले की, उत्तरेकडील थंड वारे गुजरातच्या गरमशा वाऱ्यात जेथे मिळतात तेथे कदाचित भोवरे निर्माण झाले असतील! मी मात्र पट्टा बांधून झोपी गेलो. आणि त्याने जेव्हा इराणचे आखात आले म्हणून सांगितले तेव्हा डोळे उघडून बाहेर पाहिले.

सौदी अरेबियाची भूमी पाठीमागे टाकून आखातावरून विमान समोर दिसणाऱ्या इराणच्या किनाऱ्याकडे धावत होते. पाकिस्तानला जोडून असणाऱ्या इराणच्या प्रदेशावरून आम्ही जाणार होतो. हा सर्व प्रदेश म्हणजे एक अफाट पसरलेली मरुभूमी आहे. ना गाव ना वस्ती. पाणीसुध्दा कोठे दिसले नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org