विदेश दर्शन - १९

४ लंडन

१५ नोव्हेंबर, १९६४.

दोन दिवस लंडनच्या बाहेर प्रवास करीत होतो. काल सकाळी लंडन-टॉवर पाहण्यासाठी गेलो होतो.

हे लंडन-टॉवर म्हणजे इतिहास काळी लंडनच्या राजे लोकांचे एका अर्थाने 'क्रेमलिन' होते म्हटले तरी चालेल. एक ऐतिहासिक वास्तू म्हणून तर याला महत्त्व आहेच, पण आजकाल तेथे राजघराण्याशी संबंध असलेल्या अनेक वस्तूंचे संग्रहालयही आहे.

मी विशेष लक्ष देऊन पाहण्याचा प्रयत्न केला म्हणजे तेथे असलेले विविध राजमुकुट. राज्ञीमाता एलिझाबेथच्या मुकुटामध्ये असलेला कोहिनूर हिरा मी पाहिला.

भारतामधून नेलेल्या या हिऱ्यासंबंधी अनेक कथा आपण ऐकत असतो. तो पहावा अशी साहजिकच इच्छा होती.

राज्यकर्त्या राज्ञीच्या मुकुटामध्ये हा हिरा का नाही असा प्रश्न मी येथील प्रमुखांना विचारला. तेव्हा अनेक मोंगल बादशहांच्या जीवनांत हा हिरा अपयशी ठरला आहे तेव्हा तो राज्यकर्त्या राजाच्या वा राज्ञीच्या मुकुटामध्ये वापरू नये अशी येथे भावना आहे.

मी त्यांना विचारले की, 'आपण हा हिरा अपयशी मानता तर तो भारताचा भारताला परत का करीत नाही?'

स्ट्रॅटफर्ड हे, महाकवी व नाटककार शेक्सपियरचे जन्मगाव आहे. तेथे जाण्यासाठी काल दुपारी निघालो. लंडनपासून शंभर मैलांवर हे गाव असावे. २५ हजार वस्तीचे गाव. परंतु तेथे सर्व आधुनिक जीवनाची साधने विपुलतेने आहेत. रात्री Richard III हे ऐतिहासिक नाटक तेथे मुद्दाम बांधलेल्या थिएटरमध्ये पाहिले. अप्रतिम प्रयोग झाला.

रात्री तेथे मुक्काम करून सकाळी स्ट्रॅटफर्ड upon-Avon हून ऑक्स्फर्डला आलो. वाटेत मार्लबरो पार्क व पॅलेस पाहिले.

ऑक्स्फर्डच्या तीन कॉलेजेसच्या आवारात जाऊन हिंडून फिरून आलो. दुपारचे जेवण 'ख्रिस्त-चर्च' कॉलेजच्या डीनबरोबर घेतले. या जगप्रसिध्द विश्वविद्यालयाच्या वातावरणात थोडा वेळ तरी घालविता आला याचे समाधान आहे. संध्याकाळी चार वाजता परत आलो आणि लिहिण्यासाठी बसलो.

शनिवार व रविवार हे दोन दिवस येथे संपूर्ण सुट्टी असते. सर्वजण आपापल्या घरकुलात रममाण होतात. खऱ्या अर्थाने साप्ताहिक विश्रांती घेतात.

संध्याकाळी महाराष्ट्र-समाजात जाणार आहे. रात्री रेल्वेने न्यू कॅसलचा प्रवास करावयाचा आहे. दिल्लीला परतण्यासाठी एअर-इंडियाचे विमान येथून सरळ दिल्लीला जाणार आहे हे ऐकून तर मी चकितच झालो आहे. निश्चित माहिती मिळताच तारेने माझा कार्यक्रम कळवीन. तीर्थरूप आईस नमस्कार.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org