विदेश दर्शन - १८६

निवडणुका होणार! I am happy गेल्या वर्षीच त्या घ्याव्यात असे मला वाटले होते. पी. एम्. ला तसे बोललोही होतो. पण त्यांचा मूड वेगळा होता. इमर्जन्सी राहील पण बहुतेक सर्व राजबंदी सुटतील आणि निवडणुकीचे वातावरण प्रस्थापित होईल. This is a gain

हवा मोकळी होईल. आज मी आनंदात आहे. परतल्यानंतर दीड-दोन महिने याच कामात एकसारखा गुंतलेला राहीन. २० तारखेला पहाटे दिल्लीस २॥-३ वाजता येईन. तसा संदेश पी. एम्. ला पाठविला आहे.
इथली भेट छोटी होती पण ती उत्तम प्रकारे पार पडली. आलो तेव्हा उणे २ हवा होती. पण रस्त्यावर वगैरे बर्फ दिसले नाही. ता. १६ ची रात्र येथे काढून दुसरे सकाळी 'ब्रशॉव्ह' म्हणून येथून ९० ते १०० मैलांवर असलेल्या शहरी, मोटारने गेलो. कार्पेथियनच्या रांगा ओलांडून जावे लागते.

६० कि. मी. चा घाट हिवाळी शुभ्र सौंदर्याने नटलेला होता. डोंगर व डोंगरावरील झाडे, आसपासची राने बर्फाने माखली होती. निसर्ग-सौंदर्याचा हा हिवाळी थाट मी प्रथमच पहात होतो.

तो संपूर्ण दिवस, ते शहर पाहिले. दोन लाख वस्तीचे, डोंगररांगांनी वेढलेले प्राचीन शहर आहे. एक येथील जर्मन लोकांनी पण ६०१ वर्षे चालविले प्रार्थनामंदिर - ब्लॅक चर्च - पाहिले. रोमानियन भाषेची पहिली शाळा पाहिली. (काही शतकांपूर्वीची). कारखान्यांत वगैरे भेट होती पण मी खुबीने त्यातून बाहेर पडलो.

१७ तारखेला सकाळी ब्रशॉव्हहून निघून ३०-३५ कि. मी. अंतरावरील घाटातील Predent येथे आलो. प्रेसिडेंट चाऊशेस्की या दिवसांत येथे राहतात. १० ते १२ सकाळचे दोन तास त्यांच्याशी भेटून चर्चा केली. मी त्यांना प्रथमच भेटत होतो. या देशाचे ते एकमेव सत्ताधिकारी आहेत. अत्यंत हुशार गृहस्थ म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. सी. डी. देशमुखांसारखे व्यक्तिमत्व चेहेऱ्यात, उंची व अंगलटीत आहे. दुपारी बुखारेस्टला चार वाजता पोहोचलो. विदेशमंत्र्यांना ५ ते ६ भेटलो. त्यानंतर काल व आज त्यांना परत दोन वेळा भेटलो. प्राइममिनिस्टरनाही सकाळी भेटलो.

दोन सव्वादोन कोटींचा हा देश. पण विदेशनीति अशी चपखल ठेवली आहे की, आश्चर्य वाटावे. वॉर्सा-कराराचे सभासद आहेत. अमेरिका आणि चीन यांच्याशीही आर्थिक, व्यापारविषयक उत्तम संबंध आहेत. अरबांचे मित्र आहेत, तसेच इस्त्राएलचेही दोस्त. कापेकॉनचे सदस्य तर ई. सी. सी. शीही सहकार्य. आर्थिक प्रगतीही उत्तम केली आहे. १९४४ साली पर कॅपिटा ८० डॉलर्स उत्पन्न होते. आता ते एक हजार डॉलर्स झाले आहे.

प्रखर राष्ट्रवादी देश आहे. माझे असे मत झाले की, कुठल्याही देशाची विदेशनीति समजावयाची असेल तर त्या देशांतील आवडत्या विनोदी कथा (जोक्स) काय आहेत ते समजावून घेतल्या पाहिजेत. सर्व विनोदाचा विषय रशियाची थट्टा करण्याच्या उद्योगात असतो. त्यांच्या गटात आहेत, परंतु स्वत्त्व घालविले नाही. अंतर्गत समाजवादी राजवट कडक आहे व कार्यक्षमही आहे.

असा हा छोटेखानी पण महत्त्वाचा सुंदर देश मी पाहिला. येथील नेत्यांशी मनमुराद मोकळेपणाने बोलता आले या आनंदाने मी परत येत आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org