विदेश दर्शन - १८४

९५ फ्रँकफर्ट
१५ जानेवारी, १९७७

सकाळी ६॥ वाजता येथे पोहोचलो. रोमला न थांबणारी ही फ्लाइट असल्यामुळे आमच्या अंदाजापेक्षा दोन-अडीच तास आधी पोहोचलो. त्यामुळे मोकळा वेळ बराच मिळाला. दिल्ली ते फ्रँकफर्ट ११ तास लागले. सात तास झोप झाली. तीन तासांचा वेळ सरकारी कागदपत्र वाचण्यात गेला. सकाळी उतरलो तेव्हा ताजातवाना होतो.

येथे थंडी अधिक २ डिग्री म्हणजे दिल्लीपेक्षा थोडी जास्त. मात्र सर्व एअर-पोर्ट बर्फमय होते. थंड वारा चांगलाच झोंबत होता.

आता सव्वादहा वाजता फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी या देशाचे विदेशमंत्रि श्री. गेनचर (Hans Dietrich Genscher) हे मुद्दाम बॉनवरून भेटण्यासाठी येणार आहेत. गेल्या खेपेला म्हणजे १९७५ सालीही असेच ते एकवेळ आले होते. तीही भेट विमानतळावरच होती. तशी त्यांची खास व्यवस्था असते.

या खेपेला मोठी गंमत आहे. पश्चिम जर्मनीचे आणि पूर्व जर्मनीचे (FDR आणि GDR) विदेशमंत्र्यांची भेट व चर्चा त्यांच्या त्यांच्या विमानतळावरच होणार आहे. काही प्रश्न दोघांनाही विचारण्यासारखे आहेत. परंतु त्यांची येणारी उत्तरे किती व कशी वेगवेगळी येतील ते पहाणे मोठे उपयोगी आणि मनोरंजक ठरणार आहे.

श्री. गेनचरना मार्चमध्ये हिंदुस्थानला भेट देण्याची इच्छा आहे. परंतु या आठवडयात जर आपल्या पार्लमेंटच्या निवडणुकी जाहीर झाल्या तर मार्चचा पहिला आठवडा सोयीस्कर होणार नाही. पण त्याला काय सांगावे हा पेच आहे.

मी त्यांना पूर्वीच निमंत्रण दिलेले आहे. या कामात अशी लहानशी पण धर्मसंकटे असतात. थोडया तासांसाठी हॉटेलमध्ये थांबलो आहे. १० ते १२ श्री. गेनचरना भेटून लगेच निघणाऱ्या विमानाने बुखारेस्टला प्रयाण करीन. मधेच वेळ मिळाला म्हणून लिहावयाला मिळाले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org