विदेश दर्शन - १८३

९४ लंडन
१५ ऑक्टोबर, १९७६

आत्ताच Yahoo हे प्रसिद्ध ब्रिटिश लेखक श्री. स्विफ्ट यांच्या जीवनाचे नाटक पाहून आलो. दोन सव्वादोन तासांचे गंभीर नाटक. अनेकविध नवीन तंत्रे वापरली आहेत. प्रसिद्ध ब्रिटिश नट श्री. अलेक गिनेज याने प्रमुख भूमिका केली आहे.

काल सकाळी ८॥ वाजता एअर-पोर्टवर आलो. या हॉटेलमध्ये (दि हॉवर्ड हॉटेल) पोहोचण्यास तासाचे वर वेळ गेला.

इंग्लंडची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे असे दररोज वाचतो- ऐकतो आहे. पौंड एकसारखा घसरतो आहे. पण या शहरात आल्यानंतर हे काही व्यवहारात दिसत नाही. हॉटेल्समध्ये जागा मिळत नाहीत. दुकानांत विविध तऱ्हेच्या वस्तूंची व त्यांच्या गिऱ्हाइकांची रेलचेल. नाटयगृहे - पाय ठेवायला जागा नाही अशी हाऊस फुल्ल असतात. आम्ही या हॉटेलमध्ये उतरलो कारण सेव्हॉयमध्ये जागा नाही.

काल लॉस एंजेलिस ते न्यूयॉर्क आणि लगेच लंडन असा प्रवास झाला. त्यामुळे अगदी थकून गेलो. परंतु विश्रांतीची सोय नव्हती. वेळ नव्हता. दुपारी कसे तरी दोन घास पोटात ढकलले आणि कामाला लागलो.

१९६४ नंतर प्रथमच लंडनमध्ये प्राइम मिनिस्टर व इतर कॅबिनेट मिनिस्टरना आज भेटणार होतो. महत्त्वाचे कागद चाळले. जेवणासाठी बरोबर श्री. नटवरसिंग व श्री. वेलोदी यांना निमंत्रिले होते. त्यांच्याशी चर्चेची सूत्रे बोलून घेतली.

प्रधान मंत्रि श्री. कॅलहॅन व विदेशमंत्रि श्री. क्रॉसलंड यांना भेटलो. Race Relations, South Africa’s issue and conference of Zimbabe - दोन देशांमधील व्यापार हे प्रमुख विषय होते. दोघांशीही चर्चा मनमोकळी झाली.

प्रधान मंत्रि अधिक Relaxed and warm होते. मिसेस् थॅचरशीही भेट झाली. टेलिव्हिजनवर मुलाखत करून परत आलो. कॉमनवेल्थचे मुख्य सचिव श्री. सनी रामफल नंतर आले. अर्धाएक तास होते.

दुपारी ना. मायकेल फूट यांचे जेवण होते. त्यापूर्वीची सकाळ इंडिया -हाऊसची पाहणी करण्यात, स्टाफशी बोलण्यात आणि प्रेस-कॉन्फरन्स मध्ये गेली. आज नाटकाला जाण्यापूर्वी महाराष्ट्र मंडळाचे सदस्य भेटले. काहीजण सहकुटुंब होते. एवढया खुर्च्या नव्हत्या. स्त्रियांना खुर्च्या दिल्या आणि बाकीचे सर्वजण (माझ्याशिवाय) घरच्यासारखे खाली बैठकीवर बसले. मनमुराद चर्चा व गप्पा झाल्या.

उद्या सकाळी १०। वाजता विमान आहे. त्यासाठी ८॥ला निघावे लागेल. आज थकवा नाही पण उद्याच्या प्रवासापूर्वी पाच-सहा तासांची विश्रांति लागेल म्हणून हे आवरते घेतो.

लॉस एंजेलिसमध्ये लिहू शकलो नाही. दोन रात्री आणि एक दिवस होतो. १९६४ साली ज्या हॉटेलमध्ये होतो तेथेच यावेळीही होतो. कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्सनी व्यवस्था उत्तम केली होती.

व्याख्यानासाठी भारतीय व अमेरिकन मिळून पाचशे लोक लंचसाठी आले होते. प्रश्नोत्तरे चांगलीच झाली. दिवस कसा गेला ते समजले नाही. पाच मिनिटांचीही फुरसद मिळाली नाही. रात्री एका मेक्सिकन रेस्टॉराँमध्ये मला डिनर व मेक्सिकन संगीताची मेजवानी झाली. अविस्मरणीय संध्याकाळ!

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org