विदेश दर्शन - १७३

८८ दारखान
६ सप्टेंबर, १९७६

हे शहर ३० हजार वस्तीचे आहे. आणखी पाच वर्षांनी ५० हजारांचे होईल. पूर्वी हे एक हजार वस्तीचे खेडेगाव होते.

उलानबाटर, वायव्येकडे सोव्हिएट सरहद्दीपासून १०० किलोमीटरवर आहे. सोव्हिएट सरहद्दीकडे जाणारी रेल्वे येथून जाते. आसपास मिनरल पाणी वगैरे साधने आहेत म्हणून १९६१ साली मंगोलियाच्या १४ व्या पार्टी काँग्रेसने हे नवे शहर बांधावयाचे ठरविले. उलानबाटर नंतर हेच एक शहर आहे.

शहर नवे बांधण्याचे काम चालले आहे म्हणजे विटांवर विटा रचून घरे बांधण्याचे काम चालू नाही. Pastoral civilisation पासून समाजवादाकडे चाललेला हा प्रवास आहे. एक नवा समाज जन्म घेत आहे - वाढत आहे. दारखान - व हिंदीत वापरत असलेला शब्द 'तारखान' यांच्यात समान अर्थ आहे. तारखान म्हणजे आर्टीझान. हे शहर म्हणजे City of Skills म्हणून बांधले जात आहे.

आम्ही त्यांचे sheep leather work वगैरे पाहिले. गेल्या तीन-चार वर्षांत हे सर्व नवे कारखाने उभे राहिले आहेत. सर्व समाजवादी देश व विशेषत: सोव्हिएट रशिया यांची मदत आहे. या पाच वर्षांत या शहरासाठी उद्योग-घरे व नव्या संस्था मिळून १०० कोटींची इन्व्हेस्टमेंट झाली आहे. कदाचित् पुढेही चालू राहील.

देशाची लोकसंख्या १४ लाखांची. अशी एक-दोन शहरे झाली म्हणजे त्यांची गरज पुरी होणार आहे.

शहराची व उद्योगधंद्यांची बांधणी करण्यासाठी बाहेरच्या देशांतून (समाजवादी) तज्ज्ञ व कुशल कामगार आले आहेत. आजच्या तीस हजार वस्तीत त्यांची संख्या आठ आहे. मंगोलियाचे जीवन बदलण्याचा एक मोठा उपक्रम यशस्वी वाटचाल करीत आहे असे वाटते.

आम्ही काल रात्री स्पेशल ट्रेनने उलानबाटर येथून निघालो. व्यवस्था उत्तम होती. मी १० वाजता झोपी गेलो. ४ वाजता जागा झालो. गाडी चालू होती. खिडक्यांचे पडदे दूर करून बाहेर पाहिले. काहीसा अंधार होता. आकाश स्वच्छ होते. उत्तरेकडे पाहिले तर क्षितिजावर (अगदी हाताशी असल्यासारख्या) सप्तर्षीच्या चांदण्या दिसत होत्या. ध्रुवतारा अगदी क्षितिजाशी होता. कितीतरी वेळ मी हेच दृश्य पहात राहिलो. मंगोलियाच्या उत्तरेकडे आम्ही होतो. याचा अर्थच उत्तर ध्रुवाशी आमची जवळीक झाली होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org