विदेश दर्शन - १७०

हवापाण्याच्या, श्रीलंकेच्या गोष्टी झाल्या. राजकीय प्रश्नाच्या जवळपासही यावयास तयार नव्हते. मीही प्रयत्न केला नाही. शेवटी त्यांनी इंडो-पाकिस्तान संबंध कसे आहेत व राहतील असा सरळ प्रश्न केला.

मी सूत्ररूपाने सांगितले की, ''कॉशस ऑप्टिमिझम्.'' सावधानता अशासाठी, की आजपर्यंतचा अनुभव. बऱ्याच वर्षांनंतर संबंध सुरू झाले आहेत. त्यामुळे एकदम काही चमत्कार घडणार आहेत, असे आम्ही अपेक्षित नाही. सावकाश व निश्चयाने संबंध सुधारण्याची आमची नीति आहे. 'ऑप्टिमिझम्' अशासाठी की या 'रीजन्' मधील सर्व देशांना दुसरा मार्गच नाही. जनतेचे गरीबीचे व इतर कठीण प्रश्न सोडवावयाचे असतील तर आशावाद ठेवून प्रयत्नशील राहणे हा एकच मार्ग उरतो. तुमच्या आमच्या देशासंबंधीही आम्ही असेच आशावादी आहोत.''

गंभीरपणे व लक्षपूर्वक ऐकून घेतले. परंतु चर्चा पुढे गेली नाही. दोन तासांत त्या माणसाला मी हसताना पाहिले नाही. एक ऐटबाज, अक्कडबाज म्हटले तरी चालेल - पण सत्तेमध्ये आलेला छोटा माणूस आहे. मी त्याला हिंदुस्थानचा मित्र म्हणणार नाही.

माझे हे मत त्यानंतरच्या ता. १२-१३ च्या त्यांच्या परिषदेतील बडबडीने व इतर हालचालींनी कायम झाले आहे. 'अॅन्टी इंडिया पॉलिसी' ही त्यांनी त्यांची 'स्ट्रॅटिजी' बनविलेली आहे. थोडक्यात सत्य असे आहे.

कंबोजामधील क्रांतिनंतरच्या परिस्थितीबाबत बरीच उत्सुकता होती. त्यासाठी पुन्हा भेटावयाचे ठरले. ही मुलाखत ता. १८ रोजी झाली. परिषदेचे वातावरण आता बनले आहे. दिवस कसे जातील हे समजणार सुद्धा नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org