विदेश दर्शन - १७

तेजू सोडून 'कॅरिबू' मधून आम्ही लोहित नदीच्या काठाने, डोंगराळ भागात प्रवेश करून लोहितच्या खोऱ्यातून १५ मिनिटे प्रवास केला. हियूलँग हे ठिकाण मला पहावयाचे होते. ते पाहून परत फिरलो. वेगवेगळे विमानतळ पहात प्रवास करीत होतो. ४ वाजता तेझपूरला येऊन पोहोचलो. तेथे तास-दीडतास ले. जनरल माणेकशाशी चर्चा करून तेझपूरच्या जाहीर सभेस गेलो.

खूपच मोठी सभा होती. गेल्या डिसेंबरमध्ये पहिल्या प्रथम या गावी मी पंतप्रधानांच्या बरोबर आलो होतो. त्या वेळी येथेच भरलेल्या सभेमध्ये मी प्रथम बोललो होतो. त्याची आठवण झाली. ती आठवण मी माझ्या भाषणात लोकांनाही करून दिली.

गेल्या वर्षीची आठवण या गावाला विशेष आहे. त्या वेळची धावपळ व गडबड यांची आठवण झाली म्हणजे अजूनही मन शरमून जाते. तेझपूरच्या लोकांनीही, जोरहाटच्या लोकांप्रमाणे मला एक मानपत्र दिले. मात्र त्यांनी या मानपत्राचा उपयोग आपल्या मागण्या मांडण्यासाठी मोठया खुबीने केला.

सभा संपवून मी छानदार स्नान केले. एअरफोर्सच्या मेस-मध्ये जेवण केले आणि सर्किट-हाउसवर (घरी) येऊन लिहीत बसलो.

सगळया दिवसाचा हिशोब लिहिला. शिलकेच्या बाजूला आता फक्त झोप बाकी आहे. Good Night !

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org