अशा तऱ्हेने बुध्दांच्या ५६० मूर्ति सर्व मंदिरावर प्रतिष्ठित केल्या आहेत. मूर्तीच्या ओठांवरील नित्य ओळखीचे ते सौम्य हास्य व ज्ञानी पुरुषाचे शालीन डोळे, आजही अगदी तसेच दिसतात. मनाला कसल्यातरी तृप्तीचा आनंद होतो.
शंभराच्या वर ओबड-धोबड उंच पायऱ्या चढून मी वर गेलो आणि स्तूपाच्या पायथ्याशी थांबलो. शरीर बोजड म्हणून त्रास झाला. पण हजारो मैल दूरवर असणारे हे आमच्याच जीवनाचे प्रतीक पहात असताना मन कसे हलके आणि आनंदित होते.
या मंदिराच्या नावाचा संस्कृत भाषेशी काही संबंध आहे काय? आणि मंदिर बांधण्यासाठी जी जागा निवडली आहे ती मोठी अजब आहे. तीच जागा का निवडली असावी? डॉ. मलिक बरोबर होते. त्यांचे हे दोन प्रश्न.
मंदिराचे आसमंत जागृत ज्वालामुखी - डोंगररांगाचे आहे. अशी जागा का निवडावी हे त्यांचे कोडे, त्यांना बरेच दिवस सुटलेले नाही. आम्ही तेथे गेल्यावर तिथल्या गाइड्च्या बोलण्यातून एक धागा मिळाला आणि त्यांच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.
बोरो (Boro) हे 'विहार' 'बिहार' याचे स्थानीय भाषेतील रूप आहे. आणि बुडुर हे डोंगराचे नाव. Borobudar म्हणजे Monastry in the mountainry हा अर्थ स्पष्ट होतो. दुसऱ्या प्रश्नाचे निश्चित उत्तर नाही खुलासा होतो की, बुध्द भिक्षु हे प्रार्थनेसाठी - तपासाठी डोंगराळ एकांत भागच सामान्यत: निवडतात. तसेच हेही असेल.
१९०७ साली हे मंदिर सापडले. तोपर्यंत ते ज्वालामुखीच्या लाव्हाची रक्षा, माती व दगड यांनी झाकून गेले होते. एका अर्थाने ज्वालामुखीने मंदिराचे शतकानुशतके रक्षण केले. हाही एक योगायोगच म्हटला पाहिजे.
आजही त्याच्या जीर्णोद्धाराचा आणि रक्षणाचा आंतरराष्ट्रीय प्रयत्न चालू आहे. यूनेस्कोमार्फत बरीचशी धनराशी आणि तज्ज्ञ यांची मदत मिळते. आपल्या सरकारनेही यात आपला हिस्सा उचलेला आहे.
मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामात कॉम्प्युटरायझेशनचीही मदत घेतल्याचे पहिले उदाहरण मी येथे पाहिले. लक्षावधि दगड खाली उतरवून ते सुरक्षित करून, परत बसविण्याच्या या प्रक्रियेत या शास्त्राची उत्तम मदत होत आहे. एक हिंदी तरुण तज्ज्ञ हे काम गेले वर्षभर येथे करीत आहे. अभिमान वाटला.
आज दिवसभर मी या मंदिराने भारून गेलो आहे. आशिया खंडातील पुरातन खंडातील पुरातन संस्कृतीचे हे अवशेष पाहिले म्हणजे माणूस भारून गेला नाही तरच आश्चर्य! वेरूळ-अजिंठयाची आठवण झाली. तेथील रूपसंपन्न चित्रकला व शिल्प आणि विविध भाव दाखविणारी बुध्दाची अविस्मरणीय मूर्ति यांच्या संगतीला आता बोडो-बुडुरची जोड मिळाली.
प्रवासात क्वचित् येणाऱ्या अनुभूतीची शब्दांने बांधणी करावी म्हणून हे प्रदीर्घ लेखन केले आहे.