विदेश दर्शन - १६४

८२ जोगीअकार्ता
(YOGYAKARTA)

२३ जुलै, १९७६

आताच डॉ. मलिक यांना आम्ही दिलेले रात्रीचे भोजन संपवून परत आलो. हॉटेलच्या वरच्या व शेवटच्या मजल्यावर स्वतंत्र व्यवस्था होती. जावा बेटावरील संगीताची पार्श्वभूमी होती.

आम्ही दोघांनीही अनौपचारिक भाषणे केली. गेले दोन दिवस, इंडोनेशियाचा हा सर्व सुप्रसिध्द भाग मला आपल्या बरोबर नेऊन दाखवावा अशी त्यांची इच्छा होती. म्हणून ते माझ्या साथीला आहेत. मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानले.

सकाळी बालीहून निघण्यापूर्वी एक कला-केंद्र पाहिले. नानाविध लाकडांच्या कोरलेल्या मूर्ति होत्या. पारंपरिक आणि आधुनिक यांचे मिश्रण या संग्रहात आहे.

उभ्या, नाचणाऱ्या श्रीगणेशाची मूर्ति ही मला नवीन वाटली. मूर्ति आकर्षक होती. आणखीन एक नवेपण या मूर्तिमध्ये मी पाहिले. शंकराच्या गळयात जसा सर्प असतो तसा सर्प या गणेशाच्या कमरेला वेटाळून होता.

बाली हिंदूंमध्ये त्याच कथा - रामायणातल्या आणि महाभारतातील काहीशा फरकाने सांगतात. कर्मसिध्दांतावर आणि गीतेवर फार विश्वास. बालीतील हिंदू कर्मयोगाचे तत्त्व आचरणात आणतो असे एक हिंदू वरिष्ठ अधिकारी सांगत होता. लोक उद्योगी आणि आनंदी आहेत त्याचे रहस्य त्यात आहे असे त्याचे मत.

गायीचे स्थान येथील हिंदूंच्या विचार-आचारात काय आहे हे मी मुद्दाम समजून घेण्यासाठी विचारले. (विनोबाजींच्या उपोषणाचे संकट डोळयासमोर नव्हतेच असे नाही). त्या गृहस्थाने सांगितले की आम्ही गायी पाळतो पण ते त्यांच्या दुभत्यासाठी आणि बैलासाठी. Priest-class (ब्राह्मण) सोडून बाकी सर्व हिंदू गोमांसभक्षक आहेत. आणि त्यात काही गैर व अधार्मिक आहे असे ते मुळीच मानीत नाहीत. दुपारी ११.३० ला या शहरात (जोगी-अकर्ता) पोहोचलो. दोन नंतर येथून तीस मैलांवर बोरोबुडुर (Boro budar) हे विश्वविख्यात बुध्दमंदिर आहे ते पहाण्यासाठी गेलो.

हे मंदिर जगातील सर्वांत मोठे बुध्दमंदिर आहे. ९ व्या शतकात म्हणजे १००० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले. मंदिराची रचना, शिल्प म्हणून व बुध्द तत्त्वज्ञानाचे प्रतिक म्हणूनसुध्दा अपूर्व आहे.

१२० गज लांब, रुंद व तितकेच उंच. ही लांबी-रुंदी पायाशी आहे. पण पुढे ती निमुळती होत जाते. शिखराचे जागी मोठा गोल स्तूप आहे. पूर्वेकडील प्रवेशद्वार हे प्रमुख आहे. त्यातून प्रवेश करावयाचा. जसजसे आपण वर जातो तसे प्रदक्षिणा घालता येईल अशी व्यवस्था वेगवेगळया उंचीच्या स्तरांवर केलेली आहे असे आढळून येते.

जशी जशी मंदिराची उंची चढत जाते, तसे तसे आध्यात्मिक अनुभवाचीही उंची वाढते असे दिग्दर्शित केले आहे. हे व्यक्त करण्यासाठी भगवान बुध्दांच्या मूर्तीच्या मुद्रांचा उपयोग केला आहे.

प्रथम 'रूपधातु' चे स्तरावर भगवान बुध्दांची मुद्रा भूमिस्पर्शाची आहे. अधिक वर जातो तशी ती 'धम्मचक्र' मुद्रा बनते आणि 'अरूपधातु' स्तरावर ती अभयदानाची, आशीर्वादाची, कदाचित् निर्वाणाची मुद्रा बनते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org