विदेश दर्शन - १५७

७९ अल्जीअर्स
२ जून, १९७६

बऱ्याच म्हणजे अगदी पुष्कळ वर्षांनंतर या दिवशी आपण एकत्र नाही आणि म्हणून अगदी चुकल्या-चुकल्यासारखे वाटते. येथे ३१ मे ला सकाळी झोपेतून जागा झालो तुझी हाक ऐकून - मला खरेच वाटले तू उठवते आहेस. तुझा आवाज काहीसा घाबरट वाटला - पण हे सर्व स्वप्न होते. त्यामुळे गेले दोन दिवस मनाला काहीशी हुरहूर आहे.

उद्या येथून पॅरिसला जायला निघेन. आज रात्री परिषद संपली. आमच्या मनासारखे सर्वच झाले नाही. पण मनाविरुध्दही झाले नाही.

तत्त्वाच्या भूमिकेवरून खूप खेचून धरले. एकाकी राहिलो तरी हरकत नाही असा काहीसा विचार केला. त्यामुळे या परिषदेमधून तरी सुखरूप निघालो.

आंतरराष्ट्रीय व्यवहारात एकाकी पडणे चांगले नसते. (खरे म्हणजे कुठल्याच व्यवहारात ते शहाणपणाचे नसते) पण या वेळी खेचून धरले नसते, लष्करी गटवाल्या राष्ट्रांचा चंचुप्रवेश झाला असता आणि नॉन-अलाइन्ड हे जागतिक आंदोलन संकटग्रस्त व दुर्बल झाले असते म्हणून हा सारा खटाटोप.

परिषदेचे महत्त्व होते, त्यामुळे दररोज पंतप्रधानांसाठी अहवाल पाठवीत होतो. ए. आय्. सी. सी. चुकली ही खंत मनात एकसारखी आहे. १९४७ नंतर प्रथमच हे घडले. I am missing many dear things this year. Why ? Perhaps due to new pattern of life. Perhaps destiny wills it.

अल्जेरिया हे भूमध्य समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावरचे अरबराष्ट्र. अल्जिरिया ही राजधानी. १८-२० लाख वस्तीचे शहर. समुद्रकाठी विस्तृत पहाडी चढउतारावर वसलेले सुंदर शहर वाटते. परिषद सोडून बाहेर फारसे जाताच आले नाही. फिपासा (Fpasa) म्हणून ४० मैलांवर एक ठिकाण आहे. तेथे मीटिंगमधल्या सुट्टीत - दोन-तीन तासांच्या - घाईघाईने जाऊन आलो. रोमन साम्राज्याधीन जेव्हा हा मुलुख पहिल्या दुसऱ्या शतकात केव्हातरी होता, त्या वेळचे अवशेष तेथे आहेत. रोमन्स-अरब-तुर्क-फ्रेंच आणि स्वराज्य असा काहीसा क्रम इतिहासाचा दिसतो. फ्रेंच भाषेचे प्रभुत्व फार. अरबी राष्ट्रभाषा आणि जनभाषाही आहे.

राष्ट्राध्यक्ष श्री. बूमेदिवेनला भेटलो. उंच, सडपातळ-गोरापान, आकर्षक व्यक्तिमत्त्व. लष्करी राजवट आहे. पण माणूस आत्मविश्वासू असल्यामुळे बोलण्या-वागण्यामध्ये अनौपचारिक व मोकळा वाटला.

अब्दुल अझिल बूटप्लिका - परराष्ट्रमंत्रि - चलाख - महत्त्वाकांक्षी पण बुध्दीमान माणूस आहे. अशी माणसे अशा राजवटीत किती टिकतात हे सांगणे अवघड. पण तो मात्र गेली १३ वर्षे ओळीने परराष्ट्रमंत्रि आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org