विदेश दर्शन - १५६

नंतर तेहून टर्कीचा अंतर्गत प्रश्न, त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम वगैरेसंबंधी तपशीलाने बोलले. आजच्या टर्किश सरकारजवळ 'कोहिरंट' आर्थिक धोरण नाही. त्याने प्रश्न बिकट होत चालले आहेत. एक दीड वर्षांत निवडणुकी होतील आणि आपला पक्ष बहुमतात येईल असा आत्मविश्वास त्यांनी प्रकट केला.

हिंसेचे प्रकार - विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये होत आहेत असे ते म्हणाले. परंतु त्यांचा विरोधीपक्ष, अशा प्रकारांना मुळीच उत्तेजन देत नाही. त्यावर त्यांचा विश्वास नाही. उलट आपला पक्ष यापासून दक्षतेने अलिप्त आहे. टर्कीचे जे दोन राष्ट्रीय महत्त्वाचे प्रश्न आहेत, (१) सायप्रस आणि (२) एजियन समुद्र, त्यांची उत्तरे गुंतागुंतीची होत चालली आहेत. यावर फक्त अमेरिका व पश्चिमी राष्ट्रे यांच्यावर अवलंबून राहून चालणार नाही. नाटो सोडणे अवघड असेल कदाचित, तरीही धीटपणे विकसनशील देशांशी अधिक जवळकीचे संबंध प्रस्थापित केले पाहिजेत. हे मूळ सूत्र ते सांगत होते.

त्यांचे ज्येष्ठ सहकारी - त्यांच्या सरकारमधील माजी रक्षामंत्रि व त्यांच्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी हजर होते.

दोघेही पति-पत्नी अगत्यशील व प्रेमळ होते. राहणी साधी व नीटनेटकी आहे. माझा दीड तास केव्हा गेला ते समजले नाही.

परत हॉटेलवर आलो नि पाच मिनिटांत एअर-पोर्टवर जाण्यासाठी श्री. चलयांजिल आले. ४५ मिनिटांच्या एअरपोर्टच्या वाटेवर, महत्त्वाचे असे, काही आणखीन राजकीय विषय त्यांनी पूर्वी कबूल केल्याप्रमाणे बोलून घेतले. श्री. एन्. बी. मेननला हा तपशील मी इस्तंबूलमध्ये पोहोचताच दिला.

एअर-पोर्टवर निरोप घेऊन निघताना अवघड वाटावे इतक्या प्रेमाने व अगत्याने सर्व लोक - विशेषत: विदेशमंत्रि वागले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org