विदेश दर्शन - १४०

दुपारी १२॥ वाजता वॉशिंग्टनला पोहोचलो. दुपारचे लंच - बिझिनेस लंच - एम्बसीमध्ये होते. उपसमित्यांचे सर्व चेअरमन, पार्थसारथी, एम्. जी. कौल, डॉ. नागचौधरी आणि आम्ही सर्वजण होतो. कमिशनच्या झालेल्या कामाची माहिती घेतली. उद्याच्या कामाची तयारी केली. तीन साडेतीनपर्यंत हे संपले.

बऱ्याच दिवसांनंतर दुपारची अर्ध्या तासाची विश्रांति प्रथम मिळाली. एक वर्षानंतर या घरी व याच खोलीत पुन्हा उतरलो होतो. गेले कित्येक वर्षे या शहरात - मी अमेरिकेत आलो म्हणजे - जास्त राहिलो आहे. इतर ठिकाणी एखादा दिवस किंवा एखादी रात्र काढावी अशी प्रथा होती.

आता उलट झाले आहे. न्यूयॉर्कमध्ये या खेपेला दोन आठवडे राहिलो. येथे मात्र दोन-तीन रात्री.

पाच तारखेच्या संध्याकाळचे जेवण श्री. शरद उपासनी यांचेकडे घेतले. घरगुति वातावरण होते. त्यांनी कुणालाच बोलाविले नव्हते. श्री. शरद काळे आणि मी एवढेच पाहुणे. त्यामुळे मनमोकळेपणाने जुन्या-नव्या गोष्टींच्या आठवणी निघाल्या. आपल्याजवळ काम करून गेलेली ही तरुण मंडळी आणि त्यांच्यातील जिव्हाळा पाहिला म्हणजे बरे वाटते. दुसऱ्या दिवशीच्या चर्चेची तयारी करावयाची होती म्हणून जेवण संपवून ९॥-१० लाच परत आलो.

६ ला सकाळी येथील टी.व्ही. वर एक मुलाखत झाली. हिंदी पत्रकार ५ ला संध्याकाळीच भेटून गेले होते.

११ वाजता जॉइन्ट कमिशनचे काम सुरू झाले. ४५ मिनिटांत डॉ. किसिंजर व मी यांची भाषणे संपवून आम्ही आमच्या Aids सह Bi-lataral बोलणी करण्यासाठी डॉ. किसिंजरच्या ऑफिसमध्ये गेलो. तासाभराच्या चर्चेनंतर दुसऱ्या दिवशी भेटण्याचे ठरवून आम्ही उठलो. डॉ. किसिंजर मला तरी मोकळा - स्पष्ट - आणि हिंदुस्थानशी चांगले संबंध रहावेत अशी खरीखुरी इच्छा असलेला गृहस्थ, त्याच्या बोलण्यावरून वाटला. मध्यंतरीच्या वादळामुळे त्याच्या मनात काही किंतु असेल अशी मला शंका होती. परंतु मला तसे जाणवले नाही.

स्टेट डिपार्टमेंटमधून थेट नॅशनल प्रेसक्लबपुढील भाषणासाठी गेलो. थोडा उशीरा पोहोचलो. या राजधानीच्या शहरातील हा एक वजनदार आणि प्रतिष्ठा पावलेला क्लब आहे. मी पूर्वी दोन वेळा या क्लबपुढे बोललो आहे. ही तिसरी वेळ. भाषणानंतर अनेकविध मुद्यांवर प्रश्नोत्तरे झाली.

एक अवघड तपासणीच असते ही. परंतु आमच्या पार्लमेंटच्या प्रश्नोत्तरांच्या तासाची कसोटी ज्यांनी हसत-खेळत झेलली आहे त्यांना ही प्रश्नोत्तरे अवघड जाऊ नयेत. मला वाटते, आमचा हा एक तास उत्तम गेला.

तेथून परस्पर Agrsi se - Bulg ना भेटलो. परस्परांच्या पीकपाण्याची चौकशी झाली. गव्हाच्या किंमतीचे स्वरूप काय राहील - रशिया, चीन यांची मागणी किती राहील, आमची गरज काय-बफरचा प्लॅन कसा आहे, या विषयांवर बोलणी झाली.

चार वाजता प्रेसिडेंट फोर्डशी भेट होती. त्यामुळे पाऊण तासातच येथून निघालो. बरोबर ४ वाजता व्हाइट हाउसवर पोहोचलो.

अमेरिकन प्रेसिडेंट जॉन्सनशी १९६४ साली भेट ठरली होती. परंतु एकाएकी परतावे लागले होते म्हणून ती भेट झाली नाही. प्रेसिडेंट निक्सनची भेट १९७१ साली इतर फायनान्स मिनिस्टर्सबरोबर व्हाईट हाऊसमध्येच झाली होती. चर्चेसाठी होणारी ही पहिली भेट. तीस मिनिटे Oval office मध्ये चर्चा झाली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org