विदेश दर्शन - १४

२ तेझपूर (आसाम)

सर्किटहाउस

११ नोव्हेंबर, १९६३.

हा दौरा पुरा होईतो दररोज लिहिण्याचा मानस आहे. कसे काय जमते पाहू या.

दररोज इतकी ठिकाणे पाहून होतात, इतकी वेगवेगळी माणसे भेटतात की, त्या सर्वांची एक जंत्री ठेवतो म्हटले तरी ते अवघडच. या पत्रांच्या रूपाने त्यांची जी काय अस्पष्टशी का होईना, परंतु स्मृती राहील ती सुध्दा काही कमी नाही.

आज नेफाचा पूर्वेकडील विभाग लोहित (फ्राँटियर डिव्हिजन) यामध्ये काही तास काढले. या नेफा-विभागाचे महत्त्वाचे चार विभाग आहेत. १ कॅमेंग, २ सुबानसिरी, ३ सियांग आणि ४ लोहित.

या चारही विभागांची नावे त्याच नावाच्या महत्त्वाच्या नद्या त्या विभागातून वाहतात त्यावरून त्यांना पडलेली आहेत. या माझ्या चार दिवासांच्या प्रवासात यांपैकी कॅमेंग आणि लोहित या दोन विभागांना मी स्पर्श करणार आहे. त्यांपैकी लोहित-विभागाला आज भेट दिली. कॅमेंगमध्ये उद्या प्रवेश करीन.

लोहित-विभागाचे कारभार-केंद्र 'तेजू' या नावाने छोटेखानी गाव आहे. या गावाचे नाव व स्थान मी नकाशात एकसारखे पाहात होतो त्यावरून का कोण जाणे, हे डोंगराळी मुलखातील एक स्थान अशी माझी समजूत झाली होती. आज प्रत्यक्ष गाव पाहून ती माझी गैरसमजूत होती हे स्पष्ट झाले ते बरेच झाले.

सामान्यपणे मैदानी प्रदेशावरच या गावाची बैठक आहे. हा ब्रह्मपुत्रेच्या व लोहित नदीच्या काठचा सखल प्रदेश म्हणजे वनश्रीने नटलेला आणि पाण्याच्या प्रवाहांनी वेढलेला प्रदेश आहे.

विमानातून प्रवास करताना सबंध मुलुख डोळयांखालून जातो आणि मग त्याचे वैभव मनावर ठसते. भारीच आकर्षक मुलुख!

एक छोटेखानी नदीच्या काठावर असलेल्या तात्पुरत्या विमानतळावर 'कॅरिबू' जातीच्या वाहतुकीच्या विमानातून आम्ही आलो. हे ठिकाण तेजूपासून आठ मैलांवर असावे.

तेथे स्थानिक वन्य जाती-जमातींच्या स्त्रीया व पुरुष यांनी मोठया प्रेमाने स्वागत केले. ते आपली शस्त्रे व वाद्ये सांगाती घेऊन थाटामाटाने आले होते. स्वागतासाठी इतरही अधिकारी, विशेषत: तेथील पोलिटिकल ऑफिसर श्री. डुगल व त्यांची पत्नी सौ. डुगल होत्या.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org