विदेश दर्शन - १३८

पात्रे फक्त दोन. उत्कृष्ट कामे केली. २-२॥ तास फक्त दोन पात्रांनी नाटक असे रंगविले की सांगता सोय नाही. नाटकाचा विषय, मांडणी-कलाकारांनी जीव ओतून केलेला अभिनय, यामुळे नाटक फारच परिणामकारक होते. कॉमेडी आहे. विनोद भरपूर आहे. पण सर्व विनोद मूलत: जीवनातील गंभीर अनुभूतीतून निर्माण होतो.

एका जोडप्याची विवाहबाह्य मैत्री, अकस्मात, आपापल्या गावापासून दूरच्या शहरी होते. दरवर्षी याच महिन्यात एका week end ला ते सतत २५ वर्षे भेटत राहिले. सहा सीनस् आहेत. दर पाच वर्षांनी होणारी भेट प्रत्येक प्रवेशामध्ये दाखविली आहे. २५ वर्षांतले परिस्थितींत, वयांत, स्वभावांत, मनांत झालेले फरक दाखविले आहेत. पण मैत्री अतूट आहे.

शेवटी त्यांतले गृहस्थ वृध्दपणी लग्नाची इच्छा व्यक्त करतात. आणि स्त्री म्हणते 'I cannot' कुटुंबाविषयीचा जिव्हाळा, नवऱ्याबद्दल आदर ही कारणे सांगते. आणि ती खरी असतात. तो रागावतो व निघून जातो. पण लगेच परततो आणि मैत्री संथपणे पुन्हा सुरू राहते. म्हटले तर मजा, म्हटले तर एका गंभीर प्रश्नाचे चित्रण होते.

आज सकाळी यू. एन्. मध्ये पुन्हा गेलो. नॉर्थ येमेन आणि व्हेनेझ्युएलाचे विदेशमंत्र्यांना भेटलो. यात दीड तास गेला. आज मी जाणार म्हणून डेलिगेशनच्या सर्व मेंबर्सना भेटलो. निरोप घेतला. सर्वजण आपापल्या कमिटयांच्या कामाशी चांगलेच परिचित झाले आहेत. प्रत्येकाने निदान एक-दोन भाषणे केली आहेत. मिसेस् रे, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ आणि फादर मथाईस् हे उत्तम कार्य करीत आहेत. श्री. मथाईस् ही उत्तम व अशा परिषदेसाठी उपयोगी अशी व्यक्ति आहे.

या दोन आठवडयांमध्ये निदान ५० विदेशमंत्र्यांशी भेटून कमीतकमी अर्धा तास चर्चा करता आली. लिमाचे स्पेशल सेशन व हे जनरल सेशन मिळून मी जागातील बहुतेक सर्व विदेशमंत्र्यांना भेटलो. ओळखी-पाळखी झाल्या.

व्यक्तिगत परिचयाला परराष्ट्रसंबंधाच्या क्षेत्रात फारच महत्त्व आहे. याचा परत अनुभव आला. अनुभवाच्या कक्षा वाढल्या. शिक्षणाची प्रक्रिया कधीच संपत नसते. ते नित्य चालूच राहील.

मात्र इतके दिवस दूर राहिल्यामुळे देशातील घटनांशी असलेला संबंध - जिवंत जिव्हाळयाचा संबंध, कमजोर होतो असे वाटते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org