७१ न्यूयॉर्क
१० ऑक्टोबर, १९७५
काल सकाळी ११ वाजता शिकॅगोहून येथे पोहोचलो. आज दुपारचे जेवण (लंच) 'न्यूयॉर्क टाइम्स' या वृत्तपत्राचे संपादक व संचालक मंडळातील प्रमुख सहा-सात लोकांबरोबर त्या वृत्तपत्राचे कचेरीत घ्यावयाचे होते.
दिल्लीहून आलेले कागदपत्र 'कार्लाइल' मध्ये वाट पहात होते. ते संपविले आणि श्री. टी. के. कौल, श्री. केवलसिंग यांचेसह लंचसाठी गेलो. जेवण अमेरिकन स्टाइल, बिझिनेस लंच होते.
जेम्स रेस्टॉन, गोल्ड, ओकेज् सुल्झबर्ग, रोसेन् थॉन आणखीन दोघेजण व आम्ही चौघे असे संभाषण होते. भारतीय परिस्थितीबाबत मुख्यत: चर्चा होती.
मी, इमर्जन्सी का जाहीर करावी लागली याची पार्श्वभूमी सांगितली. लोकशाहीचा त्याग केलेला नाही. अर्थात् पूर्वीचा बेजबाबदार प्रेस व परिस्थिती येऊ नये अशी काळजी घेतली जाईल असेही सांगितले. ही 'तात्पुरती परिस्थिती' आहे हेही त्यांच्या निदर्शनास आणले.
त्यांच्या मते भारताने लोकशाहीचा त्याग केलेला आहे. आर्थिक व राजकीय परिस्थिती सुधारण्यासाठी जर तसे करणे आवश्यक असेल तर लोकशाहीचा तुम्ही त्याग केलेला आहे असे मान्य का करीत नाही? अशी एकाची विचारसरणी होती. (प्रश्न विचारण्यापाठीमागे) अर्थात् रेस्टन किंवा सुल्झबर्ग समजून घेत होते. रोसेन्थॉन आणि ओकस् थोडे अग्रेसिव्ह वाटले.
Pre-censorship detention of politician with right to go to the court हे लोकशाही नसण्याचे खरे पुरावे ते मानतात.
मी काही परिस्थितीत या गोष्टीची आवश्यकता भासते आणि जोपर्यंत या गोष्टी पार्लमेंटच्या मान्यतेने व तात्पुरत्या केल्या जातात तोपर्यंत लोकशाही संपली हे निदान अन्यायाचे व पक्षपाती ठरेल. अमेरिकन इतिहासामध्ये देशाचे ऐक्य आणि स्थैर्य संकटात आले तेव्हा अशा उपाय-योजना केल्याची कित्येक उदाहरणे आहेत, हेही मी त्यांना सांगितले.
विशाल भारतात स्वातंत्र्याच्या या पहिल्या २५ वर्षांच्या अनुभवावरून काही काळासाठी या उपाययोजना केल्या आहेत व त्याचा परिणाम होत आहे. जनतेचा त्याला पाठींबा आहे हे स्पष्ट केले.
संभाषण वादविवादाच्या स्वरूपाचे नव्हते. समजून घेण्यासाठी होते. हसत खेळत चर्चा झाली. स्पष्ट व स्वच्छपणे कोणी कोणाचे मतपरिवर्तन करण्यासाठी बसले नव्हते. त्यामुळे मुद्दा कोणी जिंकला किंवा कोण हरला या दृष्टीने या संभाषणाकडे कोणीच पाहिले नाही.
जेवण संपवून उठताना जॉन रेस्टन म्हणाला, So, we have established detente between India and New York lines असे उद्गार काढले. संभाषणाचा हा सारांश व परिणाम त्यांनी एका वाक्यात सांगितला. "I don't know how eassy or uneassy this detente is going to be" ही माझी प्रतिक्रिया मी दिली.
दुपारी यू. एन्. मध्ये गेलो. आज जनरल डिबेट संपणार होते. शेवटचे भाषण श्री. बुटिफ्लिका करणार होते. मी मुद्दाम हजर राहून त्यांचे अभिनंदन केले. जनरल सेशनचे एक पर्व संपले. बहुतेक विदेश-मंत्रि या आठवडाअखेर जाऊ लागले आहेत.
रात्री Same time New year हे नाटक पाहिले. केवलसिंग, जयपाल पति-पत्नी आणि शरद काळे असे गेलो होतो. एक नमुनेदार अमेरिकन नाटक आहे.