विदेश दर्शन - १३५

७० शिकॅगो
९ ऑक्टोबर, १९७५

वॉशिंग्टनहून सकाळी ८॥ वाजता निघून दोन तासांच्या प्रवासानंतर येथे पोहोचलो. हॉटेलवर गेलो तर तेथे डॉ. पोपट यांच्या पत्नी हार घेऊन उभ्या! त्यांची कन्या येथे आहे आणि तिच्या बाळंतपणासाठी त्या आल्या आहेत. लेकीसह हजर होत्या. घरी याल का म्हणून आग्रह करीत होत्या. परंतु येथील दिवसभर आखलेले कार्यक्रम त्यांना दाखविल्यावर त्यांची समजूत पटली असावी.

सर्व दिवस आपल्याइकडे जसे दौऱ्यातील भाषणांचे कार्यक्रम असतात तसे कार्यक्रम झाले म्हटले तरी चालेल. चार भाषणे झाली. दोन ऑन रेकॉर्ड, दोन ऑफ दि रेकॉर्ड.

ऑन रेकॉर्ड सार्वजनिक भाषणे होती. त्यांचा येथील एक प्रसिध्द 'स्पीकिंग हॉल' आहे. हॉल संपूर्ण भरला होता. हिंदुस्थानसंबंधी औत्सुक्य, काही जिव्हाळा आहे. समजून घेऊ इच्छितात. विशेषत: हल्लीच्या परिस्थितीबाबत.

येथील वर्तमानपत्रे, टेलिव्हिजन वगैरे मधून फारच विरोधी प्रचार झाला आहे. प्री-सेन्सॉरशिप व अटकसत्र वगैरेबाबत फार गैरसमज आहेत.

मी सामान्यपणे ३० मिनिटे बोलत असे. अर्धा तास प्रश्नांची उत्तरे देत होतो. गेली अडीच-तीन वर्षे अराजक बांधण्याचा प्रयत्न कसा होत गेला, छोटा राजकीय गट प्रचंड बहुसंख्येच्या पक्षाला आणि सरकारला पार्लमेंटमध्ये व बाहेर काम करणे कसे अवघड करीत होता, त्याचप्रमाणे संघटितरीत्या लोक-प्रतिनिधींची विधानसभा बरखास्त करण्याचा, हिंसेवर आधारलेला कार्यक्रम मी सांगत असे.

राजकीय स्थैर्य आणि राष्ट्रीय एकता ही कशी नवस्वतंत्र देशाला आवश्यक आहेत आणि या दोन मूलभूत गोष्टींशिवाय आर्थिक व सामाजिक प्रगति, ज्यांना खरे प्राधान्य आमच्या राष्ट्रीय जीवनात आहे, केवळ अशक्य आहे.

काही कठोर पावले उचलावी लागली आहेत परंतु ती तात्पुरती आहेत. लोकशाहीचे मूलभूत स्वरूप बदलणार नाही, बदललेही नाही हे मी स्पष्ट करीत असे. अमेरिकन्स समजत असत, त्यांचे मतपरिवर्तन होत असे असा दावा मात्र करता येणार नाही. पण खरी अडचण होती ती येथे व्यवसायासाठी आलेल्या भारतीयांची. त्यांतले काही पक्के विरोधी होते. शेलके प्रश्न विचारीत असत. प्रश्नांचा भडिमार करण्याची त्यांची रीत असे.

पाच-दहा जण सभागृहाबाहेर 'इंदिरा-चव्हाण मुर्दाबाद' ची घोषणापत्रके घेऊन उभे होते!

संध्याकाळी आय्. आय्. टी. मध्ये तेथील हिंदी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम घेतला होता. सांस्कृतिक कार्यक्रम झाला.

सौ. अंजली आंबेगावकर आणि मिसेस् राजगोपालन यांचे नृत्याचे कार्यक्रम झाले. येथे राहिलेल्या भारतीय कुटुंबियांपैकी ते आहेत. फार सुरेख कार्यक्रम झाले. श्रीमती आंबेगावकर कथ्थकच्या तज्ज्ञ पदवीधर आहेत. त्या स्वत: सुंदर नाचतात. व्यक्तित्व आकर्षक आहे. बोलतातही छान. येथील युनिव्हर्सिटीमध्ये नृत्य शिकवितात.

या कार्यक्रमात आर. एस्. एस्. वाले काही होते. त्यांच्या चालीरीतीप्रमाणे त्यांनी काही खालच्या पातळीवरील प्रश्न विचारले आणि वातावरण काहीसे गरम केले. हिंदुस्थानमधील एखाद्या सभेमध्ये असल्यासारखे वाटले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org