शेवटी 'रिझोली' बुक-शॉपमध्ये गेलो. चित्रे घेऊ शकलो नाही, अॅन्टिक् घेऊ शकलो नाही, निदान न्यूयॉर्कची आठवण म्हणून न्यूयॉर्कमधील ५० वर्षांतील निवडक रेखाचित्रे, विशेष ग्रंथ रूपाने प्रसिध्द केली आहेत ती घ्यावीत म्हणून १५ डॉलर्स खर्च करून तो ग्रंथ मिळविला.
तीन-चार तासांच्या भटकंतीनंतर परतलो. काही मोटारीने परंतु जास्त पायी. असा हा भटकंतीचा प्रयोग असल्यामुळे न्यूयॉर्क पाहिल्यासारखे वाटले.
संध्याकाळी, नॅशनल प्रेस क्लबसमोर द्यावयाच्या भाषणाच्या तयारीत बराच वेळ घालविला. काल यू. एन्. मध्ये युगांडाचे अध्यक्ष ईडी अमीन दादा या वल्लीचे भाषण झाले. एक अवलिया आणि जबरदस्त दांडगेश्वर असा त्याचा लौकिक असल्यामुळे यू. एन्. चा हॉल फुलून गेला होता.
सभागृहामध्ये स्वारी जाहीर केल्यापेक्षा एक तास उशीरा आली. सेनानीचा युनिफॉर्म, सर्व तऱ्हेच्या मानचिन्हांच्या सुवर्णपदकांनी छाती भरून गेली होती.
बोलण्यासाठी उठले आणि दहा-वीस वाक्ये आपल्या आफ्रिकन भाषेत बोलले. तयार करून आणलेले भाषण आपल्या सेक्रेटरीला वाचावयास सांगितले. ते भाषण सेक्रेटरी अडखळत वाचत होता. मी कसातरी तासभर थांबलो आणि हळूच एका बाजूने निघून आलो. नंतर समजले की ते भाषण आणखी अर्धा तास चालले होते.
दुपारच्या जेवणाच्या वेळी सेक्रेटरी जनरल त्यांच्या अनेक गंमती सांगत होते. आपली १९ वर्षांची ताजी बायको व पहिल्या बायकांपासून झालेली दोन मुले बरोबर घेऊन ते आले आहेत. हाही आठवणीकरता एक नमुना !
पुढच्या आठवडयात बरचसे सरकारप्रमुख येथे येणार आहेत. परंतु मी येथे नसणार. वॉशिंग्टनमध्ये असणार. प्रिन्स सिंहनाक, जपानचे सम्राट, प्रेसिडेंट सादत वगैरे. यांपैकी प्रिन्स सिंहनाकला भेटण्याची इच्छा होती. परंतु ते शक्य नाही याची जरूर मनाला रुखरुख आहे.
उद्यापासून यू. एन्. च्या बैठकीलाही मी जाऊ शकणार नाही. हेड्स् ऑफ मिशनची बैठक उद्या व परवा आहे. रविवारी वॉशिंग्टनला प्रयाण. या खेपेला न्यूयॉर्क ते वॉशिंग्टन प्रवास रेल्वेने करणार आहे. काय योगायोग आहे समजत नाही. पण असे काही काम हाती येत राहते की, ज्यामुळे घरापासून व जिवाभावाच्या माणसांपासून मी एकसारखे दूर रहावे! हे काही आजचे नाही. माझ्या आयुष्याच्या सुरुवातीपासूनचेच हे सूत्र दिसते. तुझ्या ते चांगलेच ओळखीचे आहे. पण तू हे सर्व धीराने घेतेस - पण मला याची सारखी जाणीव येते आणि मग जेव्हा एकटा असतो तेव्हा मन हलून जाते.
पण हे उगीच लिहून गेलो. एवढयासाठीच की, मन काहीसे हलके होते.