विदेश दर्शन - १३०

त्यांतले दुसरे शक्य झाले. आणि माझा, मला दिलेला शब्द खरा ठरला. 'बादशहा' ने मुंबई-दिल्ली येथील दिलेली सोबत याची आठवण झाली म्हणजे मला अगदी गहिवरून येते. पहिले शक्य होण्याची पाळी आली नाही आणि ते एक अर्थाने बरेच झाले.

परंतु हे सगळे विचार मनात खेळत असतानाच काबूल एअर-पोर्टवर उतरलो. सरकारी स्वागतसमारंभानंतर लव्याजम्यासहित येथील इंटरकॉन्टिनेंटलच्या शेवटच्या मजल्यावरील बादशाही सूटमध्ये आणले.

सूटमध्ये प्रवेश करताना वर पहातो तो त्याचे नाव 'खैबर सूट.' आहे की नाही गंमत! निदान खैबरखिंड ओलांडून गेल्यानंतर का होईना ४-५ दिवसांसाठी या खैबर नावाच्या बादशाही महालामध्ये राहिलो. केव्हाना केव्हा मनात योजलेले अशा तऱ्हेने घडून आले.

हे सगळेच विषयांतर झाले. आल्या दिवसापासून चार दिवस कसे गेले तेच समजले नाही. वहिद अब्दुल्लाशी त्याच संध्याकाळी दीड तासांची चर्चा झाली. दुसरे दिवशी म्हणजे २९ ला सकाळी प्रेसिडेंट दाऊद यांचे धाकटे बंधू सरदार नइम यांच्याशी तासभर बोलणी झाली. जॉइंट इकॉनॉमिक कमिशनवर असलेले चार मंत्रि यांच्याशी १० ते १२ दोन तास तपशीलवार चर्चा झाली. सर्व काम पुरे झाले. हे चारही मंत्रि गेल्या चार दिवसांच्या गाठी-भेटी व चर्चा यामुळे अगदी दोस्त बनून गेले आहेत.

दुपारी १२ वाजता प्रेसिडेंट दाऊद यांच्या राजवाडयामधील ऑफिसमध्ये भेटीसाठी गेलो. १२ ते २ त्यांचेबरोबर काढले. याच वेळात बिझिनेस लंच झाले. सहा-सात जण, सर्व मिळून होतो.

त्यांची माझी ही दुसरी भेट होती. बांगलादेश, हिंदुस्थानची अंतर्गत परिस्थिती, पाकिस्तान व चीनची धोरणे, भारत-अफगाण सहकार्य हे चर्चेचे मुख्य विषय होते. नॉन-अलाइन्ड आंदोलनाचे स्वरूप व भवितव्य हा एकच चर्चेचा विषय होता.
जशी जशी चर्चा प्रगत होत गेली तसे तसे अधिक मनमोकळे होत गेले. जेवणाच्या वेळी तर चर्चेला अगदी घरगुती मोकळेपणाचे स्वरूप आले होते.

मनुष्य गंभीर व खोल आहे. राज्यकारभाराचा अनुभव आहे. जनमानसात अजून प्रतिमा चांगली आहे. पण रशिया व चीन या दोन प्रचंड पण परस्परांचे प्रतिस्पर्धि असलेल्या देशांचा शेजार-पाकिस्तानसारखा आक्रस्ताळी स्वधर्मीय शेजारी-इराण संबंध सुधारू इच्छिते परंतु त्यांचे आणि पाकिस्तानचे सूत-गूत जास्त, अशा पेचिल्या भौगोलिक परिसरामध्ये सापडलेला हा छोटेखानी अविकसित देश- आणि त्याचे नेतृत्व यांना करावयाचे आहे. त्यामुळे त्यांच्या मनावर राजकीय चिंतांचे ओझे जास्त असावे. पण तसे ते दाखवीत नाहीत. रिलॅक्स्ड् वाटले.

रशियाच्या पाठिंब्याचा, आधाराचा विश्वास दिसला. भारताबद्दल वरील परिस्थितीमुळे अधिक जिव्हाळा जरूर आहे.

गरीबी विलक्षण आहे. डोंगराळ, ओसाड मुलूख वाटतो. काबूल शहर तसे छान आहे. काश्मीरच्या, श्रीनगरच्या खोऱ्यासारखे काहीसे वाटले. अर्थात् श्रीनगरचे सौंदर्य आगळेच!

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org