विदेश दर्शन - १२८

शनिवारी सकाळी, येथून १५० मैलांवर असलेल्या Onionto या शहरामधील Harwick College च्या निमंत्रणावरून गेलो होतो.

अमेरिकेमध्ये आता मी अनेक वेळा आलो-गेलो. परंतु प्रमुखत: मोठया शहरात - उत्तम हॉटेलमध्ये राहिल्यामुळे येथील नागरी जीवनाचेच दर्शन होत आले आहे. अगदी पहिल्याप्रथम Non-urban विभाग पाहता आले.

न्यूयॉर्कच्या बाहेर २०-२५ मैलांवर गेल्याबरोबर हिरव्यागार रानात गायींचे कळप चरताना पाहून मन हरखून गेले. अवती-भोवती रंगीबेरंगी पानांच्या गर्द झाडीने झाकलेली डोंगरांची रांग, मधूनच वाहणारा लहानसा ओहोळ-फार्म हाउसेस आणि धान्य साठविण्यासाठी उभारलेले silos, येथील शेतीच्या आधुनिकीकरणाची साक्ष देत होते.

कॉलेज असलेले शहर ३०-३५ हजार वस्तीचे, डोंगराच्या आसऱ्याने इतस्तत: विखुरलेले आणि लहानमोठया 'लेक्स्' नी सोबत केलेले एक सुंदर युनिव्हर्सिटी टाऊन आहे. कॉलेजचे प्रेसिडेंट श्री. अँडरसन व त्यांची पत्नी फार आतिथ्यशील-पोक्त जोडपे भेटले. त्यांच्या सुंदर घरामध्ये त्यांनी आमची फारच उत्तम व्यवस्था केली होती.

या शहराच्या उत्तम वस्तीत देखील संध्याकाळी ७-७॥ नंतर पायी, एकटे-दुकटे हिंडणेही अशक्य आहे. परंतु या शहरातील 'चायना टाऊन' म्हणून एक विभाग आहे, तेथे मात्र आपल्याकडे, मुंबईला प्रार्थना-समाज, काळबादेवी भागामध्ये जसे रात्री १२ वाजेपर्यंत हिंडत फिरत असतात तसे दृश्य दिसले. एका रेस्टॉराँमध्ये एक डिनर होते तेव्हा हे मी पाहिले.

वेळात वेळ काढून दोन नाटके पाहिली. एक अगदीच सामान्य निघाले. परंतु एक संगीतिका Rock-Musical फारच चांगले निघाले. God's spell ही सांगितिका ख्राईस्टच्या जीवनावर आधारलेली आहे.
 
मी मुद्दाम निमंत्रणावरून गेलो होतो. त्यामुळे सर्व कलाकारांनी फारच मन लावून कामे केली. त्यांची नृत्ये-गाणी vigorous होती. त्यात परिश्रम अतोनात ओतले होते. प्रेक्षक व कलाकार यांच्यामध्ये एक अनौपचारिकतेचे नाते ते निर्माण करतात.

आपल्या नाटकांच्या थिएटर्समधील वातावरणापेक्षा मात्र येथे ही विशेषत: आढळली. नाटकानंतर मी कलाकारांना भेटलो. त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी आपल्या सर्वांच्या हस्ताक्षरांनी सजविलेले त्यांचे प्रसिध्दिपत्रक मला त्यांचे स्मरण म्हणून दिले.

दिल्ली सोडून दहा-अकरा दिवस झाले आहेत. अजून चार दिवस येथे राहून पुढे वॉशिंग्टनला जावयाचे आहे. कामे कधीच संपत नाहीत. पण प्रकृति चांगली राहिल्यामुळे हे सर्व करीत राहणे शक्य झाले आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org