विदेश दर्शन - ११०

अरब राष्ट्रांबाबत आणि जगातील स्वातंत्र्य-चळवळीसंबंधीची भारताची जी सक्रीय मैत्रीची भूमिका आहे त्याबद्दल आनंद व्यक्त केला. मी आमचे शेजारच्या राष्ट्रांशी मैत्री दृढ करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत त्यांचा काहीसा तपशील सांगितला. आर्थिक सहकार्यासाठी दोन्ही देशांत नवी कार्यक्षेत्रे निवडली पाहिजेत असे सांगितले. त्यांनी त्या दृष्टीने आपल्या मित्रमंडळाशी चर्चा करण्याचे मान्य केले. दुपारी श्री. सन्याल यांच्याशी, चार-पाच मंत्र्यांशी यादृष्टीने मुलाखतीही झाल्या.

दुपारनंतर दमास्कस शहर पहाण्यासाठी बाहेर पडलो. येथे ८ व्या शतकातील जुनी मशीद आहे. ती पहाण्यासाठी गेलो. इतिहाससिध्द मशीद आहे.

इस्लाम सुरुवात झालेला हा मुलुख आहे. महमद शेवटचा पैगंबर आहे. त्याच्या आधी प्रेषितांनाही ते सन्मानाने वागवितात, हे मशीदीवरून अनुभवास आले.

ख्रिस्तपूर्व रोमन मंदिर होते. त्याचाही पुरावा म्हणून शिल्लक ठेवला आहे. नंतर त्याचे चर्च झाले. इस्लामच्या आगमनानंतर कित्येक वर्षे हे स्थळ चर्च व मशीद म्हणून समजुतीने एकाच वेळी प्रार्थनेसाठी वापरत असत.

पुढे मुस्लिम समाजाने ख्रिश्चनांसाठी चर्चेस बांधून दिली. ही फक्त मस्जिद झाली. हे सर्व ऐकून काहीतरी अनोखे ऐकतो, पहातो आहे असे वाटले. खुद्द मशिदीमध्ये एका ख्रिश्चन साधूची कबर अगदी मध्यस्थानी आहे. तिचा योग्य तो सन्मान केला जातो. नवल आहे की नाही? पण वस्तुस्थिती आहे.

नंतर गेलो महमद पैगंबराचे नातीची कबर पाहण्यासाठी. नेहमीसारखे वातावरण होते. धार्मिकदृष्टया ऐतिहासिकता आहे. अनेक स्त्री-पुरुष भक्तिभावाने येता-जाताना दिसले.

शहराच्या पश्चिम दिशेला नव्या व आधुनिक थाटाच्या वसाहती, ज्या डोंगर-चढावावर आहेत त्या मग पहात पहात गेलो. मध्यमवर्ग वाढतो आहे. सरकारी अधिकारी, सैन्याधिकारी, व्यापारी वगैरे, त्यांचे हे स्थान आहे. आधुनिक घरे, शांत वातावरण, उत्तम रस्ते हे सर्व ओलांडून डोंगर पार केला आणि एकदम मावळतीला कललेले तेज:पुंज सूर्यबिंब दिसले.

लेबनॉनच्या सरहद्दीवर असलेल्या डोंगरमाथ्यावरून सूर्य हळूहळू नजरेआड होत होता. फार दिवसांनी सुरेख सूर्यास्त पहात होतो. गार वारा आल्हाददायक होता. किती तरी वेळ तसाच थांबलो. अंधार वाढू लागला. सिरियाचा संरक्षण-अधिकारी हलकेच जवळ येऊन म्हणाला, 'सर, आता परतले पाहिजे. विदेशमंत्र्यांना तुमचे रात्रीचे भोजन आहे.'

सरकारी औपचारिकतेच्या जंजाळात परत पाऊल टाकले. पण परत फिरून पुन्हा एकवेळ सूर्यास्तानंतरचे डोंगरमाथ्यावरचे लालसर कवडसे पाहूनच!

उद्या सकाळी बेरूतहून राजदूत श्री. एस्. के. सिंग येणार आहे. त्याला भेटून एक वाजता येथून निघेन. कैरोमार्गे २ जूनला* सकाळी दिल्लीत. योगायोगाने २ जूनला मी परत येतो आहे याचा फार आनंद आहे.
------------------------------------------------------------------
* २ जून हा दिवस यशवंतराव व वेणूताई यांच्या विवाहाचा वाढदिवस
-------------------------------------------------------------

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org