विदेश दर्शन - १०७

ही नदी म्हणजे खऱ्या अर्थाने या देशाचे जीवन आहे. हजारो वर्षे या नदीच्या काठी संस्कृति विकास पावत गेली. अनेक साम्राज्ये बनली, वाढली व मोडली गेली. या देशातील ८० टक्के जनता या नदीच्या काठी राहते. पश्चिमेला वाळवंट आहे.

श्री. नासरने आस्वानचा मोठा तट उभा केला. त्यामुळे वीजउत्पादन वाढले आहे. पुराचे संकट टळले आहे. प्रवाह केव्हा, किती असावा हे नियंत्रण शक्य झाले आहे. अर्थात् यामुळे नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत असे सांगणारेही लोक भेटले.

जो काही थोडा वेळ मिळाला त्यात येथील काही गोष्टी पाहून घेतल्या. म्युझियम - ख्रिस्तपूर्व दीड-दोन हजार वर्षांचा इतिहास तेथे पहावयास मिळतो. जुनी हत्यारे, मूल्यवान जडजवाहर, अनेकविध मूर्ति व विशेषत: 'ममीज' येथे पहावयास मिळतात.

म्युझियमची आधुनिक मांडणी नाही. स्टोअरसारखे दाटीवाटीने वस्तू ठेवल्या आहेत. इस्लाम व अरब या देशात येण्यापूर्वीच्या काळच्या संस्कृतीचे हे अवशेष आहेत. या संस्कृतीचा आपला अतूट संबंध आहे अशी भावनात्मक जाणीव कमी दिसली. परंतु त्याचा काहीसा परिणाम जरूर असावा. नासरच्या सेक्युलर धोरणाची शक्यता या परिणामातून निर्माण झाली असावी.

Citadal म्हणून नदीच्या पूर्वेकडील भुईकोट किल्ला आणि त्यातील १२व्या शतकातील इमारती व मशिदी पाहिल्या. शेवटी आज दुपारनंतरचे तीन तास पिरॅमिड्स्, Finx च्या आसमंतात काढले.

इजिप्त व पिरॅमिड्स् हे नाते अतूट आहे. सम्राट, राजे-महाराजे या मंडळींना अमर होण्याचा मोठा षोक प्राचीन काळापासूनच आहे. आपली सारी सत्ता, संपत्ती व लक्षावधींचे घामाचे श्रम या कामासाठी वर्षानुवर्ष वापरली गेली आहेत.

पण हे सर्व खरे असले तरी त्या काळच्या संस्कृतीचा (साडेतीन चार हजार वर्षांपूर्वीच्या) इतिहास या अवशेषांमुळे जतन झाला आहे हे कबूल केले पाहिजे. Finx म्हणजे सिंहाला मानवी चेहरा दिलेली मूर्ति. हे एक मानवी पराक्रमाचे व सत्तेचे उत्तम प्रतीक आहे. या चेहेऱ्याचे नाक तुटले आहे.

नेपोलियन बोनापार्ट आक्रमण करून या देशात आले तेव्हा त्यांनी तोफेचे गोळे उडवून हा प्रकार केल्याचे समजले. एका थोर पराक्रमी पुरुषाने हे करावे याबद्दल विषाद वाटला. नेपोलियनबद्दल वाटणाऱ्या आदरातून एक टक्का तरी उणा केला पाहिजे असे मनात येऊन गेले.

या शहरात तीन विश्वविद्यालये आहेत. कैरो युनिव्हर्सिटी पाहिली. विद्यार्थी अत्यंत जागृत दैवत आहे. ७२ साली युध्द झाले पहिजे म्हणून निदर्शने करून सादतसाहेबांना यांनी हैराण केले होते.

बाकी शॉपिंग वगैरेसाठी कोठे जाताच आले नाही. निदान दुकाने, मांडणी, विविध वस्तू पाहून तरी घ्याव्यात असे जरूर वाटते. पण या भेटीत वेळ अपुरा पडला. सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत वेळ कसा जात होता तेच समजले नाही.

ओबेरॉयच्या मॅनेजमेंटखाली मीना हाउस म्हणून एक हॉटेल, पिरॅमिड्सच्या अगदी जवळ चालते. नवीनच आहे. तेथे हिंदी-इजिप्शियन मित्रसंघातर्फे स्वागत-समारंभ झाला. दोन्ही समाजांतील अनेक प्रमुख लोक होते.

उत्तराच्या भाषणात जेव्हा मी 'गंगा - यमुनेच्या प्रदेशांतील जनतेच्या शुभेच्छा नाईल-काठच्या जनतेसाठी मी घेऊन आलो आहे' अशी सुरुवात केली तेव्हा सर्व लोक हर्षोत्फुल्ल झाले. या सर्व भेटीत हाच विचार माझ्या मनात एकसारखा होता म्हटले तरी चालेल. आता दमास्कसमधून लिहीन.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org