विदेश दर्शन - १०६

त्यानंतर अर्धा तास तेहून फार मोकळे व स्पष्ट बोलले. सोव्हिएटवर खूपच राग आहे त्यांचा. त्यांना ते गैरभरवशाचे राष्ट्र वाटते. त्यांच्यावर अवलंबून राहू नका असा तुमच्या प्रधानमंत्र्यांना माझा निरोप सांगा इथपर्यंत स्वारी गेली.

जिनिव्हा-कॉन्फरन्स अपरिहार्य आहे असे त्यांना वाटते. ती यावर्षी झाली पाहिजे व तशी ती होईल असेही त्यांना वाटते.

अमेरिकन प्रेसिडेंटला भेटण्यासाठी युरोपमध्ये दुसऱ्या दिवशी ते जाणार होते. परंतु प्रेसिडेंट श्री. फोर्ड यांच्या मनात नेमके काय आहे त्याचा आपल्याला पत्ता नाही. फोर्ड अॅडमिनिस्ट्रेशन दुबळी आहे. फोर्डला आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे बारकावे अजून समजलेले नाहीत. त्यामुळे त्यांची पुरी पकड नाही. उलट पुढच्या वर्षी निवडणुका असल्यामुळे इस्त्राएल अमेरिकेतील धनिक ज्यूंच्यामार्फत फोर्डवरच दडपण आणील अशी भीति त्यांच्या मनात आहे.

इजिप्तचे हित हे प्रथम - बाकी सर्व नंतर असा त्यांचा अग्रक्रम दिसला. माझे रशियनांशी भांडण नाही; पण मी त्यांच्या खिशात जाऊन नाही बसणार. मला दोन्ही प्रमुख सत्तांचा समतोल ठेवावयाचा आहे. तो बॅलन्स ठेवला तर त्यांची खरी मदत हा प्रश्न सुटण्यास होणार आहे.

अरबांमध्ये अनेक भांडणे आहेत. परंतु त्या सर्वांना भेटून त्या सर्वांना समजावण्याचा मी प्रयत्न केला आहे. पी. एल्. ओ. मध्ये फार गट आहेत. अराफतची शक्ती तो दाखवितो तितकी नाही. They want to be tamed and I am trying to tame them. अशी त्यांनी आपली बाजू सांगितली.

प्रधानमंत्र्यांच्यासंबंधी भारतासंबंधी फार आपुलकीने बोलले. I have something up my sleeve. but I will not disclose it now असेही एकदा बोलून गेले. मी प्रयत्न करीत राहाणार आहे. एक प्रयत्न फसला तर काही दुनिया बुडाली असे मी समजणार नाही. दुसरा प्रयत्न सुरू करीन. मी आशावादी आहे. तसाच वास्तववादीही आहे अशी त्यांनी आपली कैफियत मांडली.

मला त्यांचे म्हणणे पटो वा न पटो परंतु I came back impressed by his staring installed personality and sheer logic of his arguments. संस्मरणीय मुलाखत झाली म्हटले तरी चालेल.

अशा तऱ्हेने २८ संध्याकाळपर्यंत माझे महत्त्वाचे काम संपले.

कैरो शहर मी प्रथमच पाहिले. १९६४ साली लंडनच्या वाटेवर, विमानतळावर तासभर थांबलो होतो एवढीच जुनी आठवण. आता तो विमानतळ लष्करी विमानतळ बनला आहे. एक नवे विस्तीर्ण शहर -उभे राहिले आहे.

नाईलच्या काठचे हे प्राचीन शहर अगदी आधुनिक शहरांपैकी एक झाले आहे. ६०-७० लाख वस्ती आहे. नाईलच्या दोन्ही काठी शहर पसरले आहे. नाईलच्या पूर्वेची वसाहत जुनी व विस्तृत आहे.

संध्याकाळच्या वेळी नाईलच्या दोन्ही काठांची शोभा प्रेक्षणीय आहे. मेरिडियन हॉटेल नाईलचे अगदी काठावर आहे. तसे म्हटले तर काहीसे नदीतच आहे. नदीकाठच्या गॅलरीमधून संध्याकाळी नाईलचा संथ पण विशाल प्रवाह व त्यात चमकणारे काठावरचे प्रकाशदिवे पहाण्यात मोठी मौज आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org