विदेश दर्शन - १०४

This area is full of profound contradictions and equally profound problems as it is in India.

अमेरिकन आर्थिक प्रभुत्वाचे अस्तित्व व त्यापासून मुक्त होण्याची प्रेरणा, हा प्रमुख विचार येथील राजकारणाच्या पाठीमागचे ऐक सूत्र आहे. State home Relationship आहे म्हटले तरी चालेल.

लोकसंख्येची वाढ आणि गरीबी हे येथील स्फोटक प्रश्न आहेत. या बाबतीत भारताच्या व या देशातील प्रश्नांचा तोंडावळा हा एकसारखा वाटतो.

मेक्सिकन सरकारचा पाहुणा नव्हतो तरी येथील सरकारने आमची देखभाल चांगली ठेवली होती. येथील प्रेसिडेंटना भेटण्यास गेलो होतो. ३५-४० मिनिटे एकत्र होतो. भारतासंबंधी आपुलकी आहे; पण निश्चित स्वरूपाची सहकार्याची क्षेत्रे निवडून ही आपुलकी खंबीर पायावर उभी केली पाहिजे असे त्यांनी बोलून दाखविले. राजदूतांच्या परिषदेसाठी मेक्सिकोची निवड केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

काल इराणचे शहेनशहा यांचे बॅक्वेट होते. त्याचे त्यांनी खास आग्रहपूर्वक निमंत्रण दिले. सर्व डेलिगेशनसह या सोहाळयात सामील झालो. Colourful function. तीन हजार लोकांना एकत्र जेवण होते. प्रेसिडेंटच्या राजवाडयातील एका विस्तीर्ण प्रांगणात सजावट उत्तम केली होती. लक्षात राहण्यासारखा अनुभव.

सकाळी थोडा वेळ मिळाला म्हणून येथून ३० मैलांवर असलेले प्राचीन पिरॅमिड्स् पाहून आलो. स्पॅनिश लोकांनी हा देश जिंकला त्यापूर्वी येथे अनेक राज्ये व वेगवेगळया संस्कृति विकसित झाल्या होत्या.

ख्रिस्तपूर्व ५०० वर्षांपूर्वी बांधलेला पिरॅमिड आहे. इजिप्तचे पिरॅमिड्स् आणि या पिरॅमिड्स् मध्ये एक प्रमुख फरक आहे. येथील पिरॅमिड्स् म्हणजे त्या लोकांनी बांधलेली मंदिरेच आहेत. चंद्राचा पिरॅमिड, सूर्याचा पिरॅमिड अशी त्यांची नावे आहेत.

इजिप्तमधील पिरॅमिड्स् म्हणजे तेथील शक्तिशाली राजांच्या व प्रमुख स्त्रीपुरुषांच्या कबरी आहेत. इतिहासातील अनेक आश्चर्यांपैकी हेही एक आश्चर्य आहे की, हजारो वर्षे नांदत आलेली ही संस्कृति व राजा, कोर्टीस (Courtes) या स्पॅनिश सेनापतीने ४०० सैनिकांच्या मदतीने पराभूत करून एका नव्या साम्राज्याचा आणि नंतर एका विशाल मिश्र समाजाचा पाया घातला.

या आक्रमकांमध्ये आक्रमकांची विजिगीषुता होती. नवी शस्त्रे (तोफा, बंदुका, घोडे) होती. त्यापुढे ही जुनी संस्कृति नमली. पण तिच्यातील काही मूलभूत शक्तीमुळे ती संपूर्ण पराभूत झाली नाही.

कालाच्या ओघात त्या संस्कृतीचा परिणाम जेत्यांवरही झाला. त्यांच्या परंपरा आणि युरोपातून, आफ्रिकेतून आलेल्या लोकांच्या मिश्र जीवनांतून एक नवाच समाज तयार झाला आहे.

काल या हॉटेलमधील दुकानातून फिरून आलो. एक-दोन पुस्तके खरेदी केली. बाकीच्या वस्तु पाहिल्या परंतु महागाई फार म्हणून विचार सोडून दिला.

येथील राजदूतावासामध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना व परिषदेसाठी आलेल्या राजदूतांना रात्री मी निरोपाचे भोजन दिले. हॉटेलमध्ये परत येऊन हे लिहीत आहे.

सर्व दिवसाचा खूप थकवा आहे. प्रवासाचा कंटाळा आला आहे. घरच्या आठवणीने अस्वस्थ वाटत आहे. पण आता ४-५ दिवसांनी घरी जाणार म्हणून परतीच्या प्रवासाची ओढही आहे. दिल्लीचे ८-१० दिवसांचे पेपर्स काल एकत्र पाहिले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org