विदेश दर्शन - ६

या विदेश-यात्रांमध्ये राजकारणाबरोबरच तत्त्वचिंतनालाही धार येत असे. या पत्रव्यवहाराच्या शेवटी त्यांच्या मनात गर्दी केलेल्या अनेक प्रश्नांचा आढावा ते घेत आहेत. या प्रश्नांसंबंधी ते म्हणतात की, ''गेले अनेक महिने व काही वर्षे म्हटले तरी चालेल, हे प्रश्न मनात जमलेले आहेत. काही प्रश्न उभे रहात गेले आणि त्या त्या वेळी उत्तरे मिळत गेली. परंतु उत्तरांची सुसंगत आखणी झालेली नाही. पुढल्या वर्षी तीस वर्षे होतील, मी पहिली निवडणूक जिंकून सरकारमध्ये आलो. सत्ता हस्तगत करण्याकरता लोक प्रयत्न करतात, सत्ता माझ्या हातात आपोआप आल्या. समाजाच्या परिवर्तनासाठी मी त्या वापरल्या. दलितांबद्दल कणव ठेवून सामाजिक न्याय प्रस्थापित केला पाहिजे ही माझी प्रेरणा प्रथमपासूनची होती. सत्तेच्या केंद्रस्थानी असताना उच्च उद्दिष्टांसाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. पण आज मी जेव्हा राजकारणातले चित्र पाहतो, तेव्हा माझे मन अस्वस्थ होते.

खरोखरीच आपण काही नव्या कामाचा पाया घातला होता का? खरी जिव्हाळयाची माणसे अवतीभोवती होती का? झाले हे पुरे नाही का? असाच खेळ पुढे किती दिवस, कुणासाठी आणि काय म्हणून चालू ठेवायचा, असा प्रश्न माझ्यापुढे आहे. मी काही राजकारण-संन्यास घेण्याचा विचार करत नाही. विचार येतो निवडणुकांचा आणि सत्तास्थानांचा. आज सत्तास्थानांवर राहण्याची अनेकांची धडपड चालू आहे. आहेत ते तेथेच कसे राहता येईल यासाठी साधनशुचितेचा कसलाही विचार न करता, अगदी क्रूरपणे कारस्थाने करताहेत. त्या कारस्थानाचे बळी होण्यापूर्वीच योग्य वेळी, योग्य निर्णय घेऊन बाजूला झाले, तर बरे नाही का? असा प्रश्न मनात घोळत आहे.'' (माटेंगो बे-जमेका- दि. ४ मे १९७५) हे प्रश्न लिहून झाल्यावर दहा वर्षांनी निसर्गानेच यशवंतरावांना बाजूला केले.

अशा तऱ्हेचे लेखन यशवंतरावांनी जी सत्तास्थाने भूषविली त्या सत्तास्थानांवरील कोणत्याही भारतीय व्यक्तींनी केलेले नाही याचे कारण इतका उच्च दर्जाचा ध्येयवाद, तात्त्विक चिंतन, साहित्य कुशलता, यांचा त्यांच्या ठिकाणी अभावच होता हे सूचित होते.

हा पत्रसंग्रह भारताच्या गेल्या ४० वर्षांतील राजकीय इतिहासामध्ये एक महत्त्वाची अशी देणगी आहे. ही देणगी यशवंतरावांच्या कायमच्या, अत्यंत विश्वासातील श्री.रामभाऊ जोशी यांनी जनतेला प्राप्त करून दिली यात त्यांचे ॠण जनतेने लक्षात घेणे आवश्यक आहे.

हा पत्रसंग्रह _ 'विदेश-दर्शन' _ मराठी साहित्यातील एक उच्च दर्जाची साहित्यकृती म्हणून विराजमान होईल यात शंका नाही.

वाई: लक्ष्मणशास्त्री जोशी

दिनांक १८ मे, १९८८

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org