महाराष्ट्रातील दुष्काळ - ९३

सरकारी खाक्या

सरकारी धोरणात हे बांध बसले नसते, बांधांची उंची, त्याची जागा हे सारे गणितही सरकारी अभियंत्यांच्या नियमात बसले नसते.  शिवाय या स्वरूपाच्या बांधासाठी सरकारी तिजोरीतून १ लाख ७० हजार रुपये खर्च केले गेले असते !  आणि यासाठी किती महिने काम चालले असते याचा अंदाज करणेही कठिण !

एकप्रकारे ज्यासाठी सरकार पावणेदोन लाख रुपये खर्च करते, त्या स्वरूपाचा बांध गावाने स्वतःच बांधून घेतला तर पाऊण लाखात होऊ शकतो हे दाखवून देऊन आडगावने सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार आणि उधळपट्टीचाच पुरावा दिला आहे. !

मुख्य ओढ्यात जसे बांध घालून पाणी अडविण्यात आले, तसेच इतर छोट्या नाल्यांतही दगडमातीचे बांध घालून अनेक ठिकाणी डबकी करण्यात आली.  पाणी जेथे अडले व साठून राहिले, तेथे ते जमिनीत मुरूही लागले.  एरवी जे पाणी वाहून गावाबाहेर जात होते ते मोठ्या प्रमाणावर गावातच मुरू लागल्यामूळे गावातील विहिरीची पातळी हळूहळू वाढू लागली !

पीक कमी का ?

पाणी वाहून जाताना दिसत होते, पण माती किती प्रमाणावर वाहून जाते हे थोडेच दिसत होते !  वर्षे जातात तसे अधिक खत घालूनही पीक मात्र कमी कमी येत जाते.  एवढेच गावकर्‍यांना कळत होते.  याचे कारण काय होते ?  पावसाळा आला की, शेतकरी जमीन कसत.  खते घालीत.  पण पहिल्याच जोराच्या पावसाचा आघात झाला की, पृष्ठभागावरील माती जोराने वाहणार्‍या पाण्याबरोबर वाहून जाई. प्रत्यक्षात पेरणी होई, ती निकृष्ट जमिनीवर.

जमिनीवरील माती वाहून जाऊ नये म्हणून काम करायला हवे होते, एक म्हणजे उतारांवरून वाहणार्‍या पाण्याचा वेग थोपवायला हवा होता.  दुसरे म्हणजे, पावसाच्या थेंबाच्या जमिनीवरील आघाताचा जोर कमी करायला हवा होता.  म्हणजे जमिनीवर पडण्यापूर्वी गवतासारख्या एखाद्या आवरणावर पाऊस पडावा आणि पावसाचे थेंब हलकेच ओघळून जमिनीवर यावेत अशी व्यवस्था करायला हवी होती.

उपाय आणि परिणाम

पाण्याचा वेग थोपविण्यासाठी अधिक उताराच्या जमिनीवर मोठे खड्डे खणण्यात आले.  उतारानुसार वेगवेगळ्या आकारांचे वळणावळणाचे बांध (कॉण्टूर बंडिंग) घालण्यात आले.  दोन बांधांच्या मधल्या पट्ट्यात शेती करायची, बांधावर बोरीसारखी लवकर वाढणारी आणि दुष्काळातही टिकून राहणारी झाडे टिकावीत म्हणून पूर्णपणे 'चराईबंदी' राबवायची.... दोनच वर्षात या कार्यक्रमाचे डोळ्यांत भरण्याइतके परिणाम दिसले आणि गावकर्‍यांचा विश्वास अधिक दृढ झाला.

पहिल्या वर्षी ओढ्याला बांध घातल्यामुळे जेथे उतारावरून वाहून येणारे पाणी आले, तेथे ज्या प्रमाणात गाळ साठला, त्यावरून खरोखरच किती माती वाहून जात होती, याची कल्पना गावकर्‍यांना आली.  यावर्षी उतारावर गवत वाढले, बांधांचे काम पूर्ण झाले आणि हा गाळही जवळजवळ दिसेनासा झाला !  जमिनीची धूप लक्षात येण्याइतकी कमी झाली.

आज गावात गेले तर पूर्वी जेथे उजाड माळरान होते तेथे सोनेरी उन्हात दिमाखाने चमकणारे गवताचे पांघरूण दिसते.  या पांघरूणामुळे बाष्पीभवनाने होणारी पाण्याची घटही टळली.  आता काही ठिकाणी पाय रूतेल इतका चिखल दिसतो.  छोटे-छोटे झरे तर असंख्य आढळतात.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org