महाराष्ट्रातील दुष्काळ - ८९

फळे व जंतुनाशके

फळांच्या निर्यातीत फळबागांसाठी आपण जी जंतुनाशके वापरतो त्याचप्रमाणे त्याचे फळात अत्यल्प प्रमाण असण्यालाही परदेशी बाजारपेठेत मोठे महत्त्व आहे.  अविचाराने जंतुनाशके वापरली तर फळाच्या निर्यातीवरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.  चिलीतील सध्याचे अरिष्ट निराळ्या कारणामुळे उत्पन्न झाले आहे.  परंतु त्यामुळे तेथील फळाबागांच्या धंद्याच्या विस्ताराची जी माहिती जगापुढे आली त्याचा उपयोग महाराष्ट्राची शेती उभारण्यासाठी व समृद्ध करण्यासाठी करणे कसे शक्य आहे, याचा विचार करून महाराष्ट्र शासनाने आणि फळबागा लावू इच्छिणार्‍यांनी नियोजन केले पाहिजे.  चिलीमधील बोरे आणि द्राक्षे या शिवाय आपल्या हवामानात कोणती फळे पिकविणे शक्य आहे याची माहितीही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.

पुढील पाच-दहा वर्षांत संत्री, द्राक्षे, डाळिंबे, बोर, चिंच, पेरू, चिकू, आंबा, काजू, रामफळ, सीताफळ, अननस इत्यादींच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्यामुळे या उत्पादनाची विक्री, वाहतूक, प्रक्रिया, साठवण, इत्यादीबाबत बरेच गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होणार आहेत.  आपल्याकडे आग लागल्यावर आगीचा बंब पाठविण्याची पद्धत आहे.  त्याऐवजी आतापासूनच याची तयारी केली पाहिजे.  महाराष्ट्र शासनाने शंकरराव कोल्हे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली याच हेतूने एका समितीची स्थापना केलेली आहे.

महाराष्ट्रातील फळबागांची वाढ करताना कमी पाणी लागणार्‍या फळबागांवर अधिक भर दिला पाहिजे.  म्हणजे दुष्काळी भागाचे व जिराईत शेतीचे प्रश्न सुटण्यासही मदत होऊ शकेल.

प्रथम प्रकाशन :  सकाळ, पुणे

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org