महाराष्ट्रातील दुष्काळ - ६४

राष्ट्रीय उत्पन्न घटेल

आठमाही कालव्यामुळे पाणी पट्टीच्या रूपाने मिळणार्‍या फार मोठ्या उत्पन्नात घट होणार आहे.  या शिवाय साखर कारखाने व पूरक उद्योग ह्यापासून मिळणार्‍या अबकारी करासारख्या मोठ्या उत्पन्नालाही मुकावे लागणार आहे.

घनमापन पद्धत :

ज्या नदीवर धरण व कालवे चालू आहेत, वा भविष्य काळात कार्यान्वित होणार आहेत, अशा नदीच्या खोर्‍यातील धरणाच्या फुगवट्यापासून तो ती नदी दुसर्‍या नदीला मिळेपर्यंतच्या दोन्ही तीरावरील असणार्‍या सर्व शेतकर्‍यांना समप्रमाणात तिन्हीही हंगामात पाणी पुरवठा करण्याची हमी देणे व प्रत्येकाच्या वाट्याला मिळणार्‍या पाण्याच्या कोठ्यातून शेतकर्‍याला हवी असलेली पिके करण्याचे स्वातंत्र्य देणे हे घनमापन पद्धत वापरली तरच साध्य होणार आहे.  आकारणी घनमापन पद्धतीवर करण्याची शिफारस आहे.  प्रचलित पाणी वाटपपद्धतीमध्ये शासन कालव्याच्या समादेश क्षेत्रातील शेतकर्‍यांना पिकांची हमी देणे व आकारणी पिकाच्या क्षेत्रावर होते.  त्यामुळे शेतकरी पिकाला वाजवीपेक्षा जास्त पाण्याचा डोस देतो,  विनापरवाना पाणी देण्यात येते, पाणी नाश करण्याच्या पुष्कळ पळवाटा या प्रचलित पाणी वाटप पद्धतीमध्ये आहेत.  त्या सर्व वाटा घनमापन पद्धतीने बंद होतील व पाणी अगदी काटकसरीने वापरले जाईल.

''अ'' शेतकर्‍याला कालव्याच्या समादेश क्षेत्रामध्ये आठ एकर जमीन आहे. या शेतकर्‍याला चार एकर खरीप, चार एकर रब्बी, ही भुसार पिके व अर्धा एकर उन्हाळी घास कडवळ सारखी ही पिके करण्याकरिता लागणारे पाणी पुरवण्याची हमी द्यावयाची आहे.  शेतचारीच्या विमोचकाची म्हणजे चिमणीच्या तोंडाशी ए.आ.डी.सी. ४ धरणांची शिफारस आहे.  या शेतकर्‍याला खरीप व रब्बीमध्ये प्रत्येक पाळी आहे १ क्सुसेक किंवा प्रत्येक पाळीला अर्ध्या क्सुसेक प्रवाह मिळणार आहे.  उन्हाळा हंगामात १४ क्सुसेक प्रवाह मिळणार आहे.  खरीप रब्बी व उन्हाळा हंगामामध्ये १४ दिवसाची पाळी राहाणार आहे.  खरीप व रब्बीमध्ये त्याला ह्या ८ एकरांत निव्वळ भुसाराची पिके करता येतील.  प्रत्येक पाळीला ३'' पाण्याची मात्रा देऊन तो ८ एकरांमध्ये भुसार पिके उभी करू शकेल.  या शेतकर्‍याला समजा ऊस लावावयाचा असेल तर त्याला उन्हाळ्यात मिळणार्‍या १४ क्सुसेक प्रवाहावर तो अर्धा एकर ऊस लावेल आणि खरीप व रब्बीमध्ये उरलेल्या पाण्यावर सहा एकर भुसारची पिके करील.  अशाप्रकारे आपणास मिळालेल्या पाण्याचा तो काटकसरीने व पूर्णपणे फायदा उठवील.

ज्याला ८ एकरापेक्षा जास्त जमीन आहे त्याला मात्र ३'' प्रमाणे ८ एकर क्षेत्राइतकेच पाणी देण्याची शिफारस आहे.  ज्याला ८ एकरांपेक्षा कमी पण ४ एकरांपेक्षा जास्त जमीन आहे, त्याला ८ एकरवाल्यासारखी जमीन लागू पडेल व उन्हाळ्यात त्याला १४ क्सुसेक पाणी मिळेल.  ज्याला ४ एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन आहे, त्याला खरीप व रब्बीचे पाण्याचे प्रमाण अप्रमाणित राहून उन्हाळ्यात त्याला १० गुंठे क्षेत्र भिजविण्याचे पाणी मिळेल.  हीच पद्धत कालव्याच्या वरच्या अंगास जर सामुदायिक उपसासिंचन योजना राबविली तर त्या क्षेत्राला वरील प्रमाणे पाण्याची हमी देता येईल.  त्याचबरोबर उपसा सिंचन योजनेच्या पंपावर पाण्याचा मिटर बसविण्यात येऊन मंजूर झालेले पाणी देण्यात येईल.  पण त्याचबरोबर मंजूर झालेल्याप्रमाणे क्षेत्र आहे किंवा नाही यांचीही खात्री करण्यात येईल.

कालव्याची धारणाशक्ती काढताना समादेश क्षेत्राप्रमाणेच कालव्याच्या वरच्या अंगाच्या नदीच्या खोर्‍याच्या हद्दीपावेतो क्षेत्राचा विचार करून व वरील पाणी वाटपपद्धत स्वीकारून कालव्याची धारणाशक्ती काढावयास पाहिजे.

नदीच्या खोर्‍यात पावसाळी हंगामात मागणी जरी कमी आली तरी कालवा त्यांच्या धारणाशक्तीनुसार सोडण्यात येईल व ठिकठिकाणी नाला पाझर तलाव ह्यात पाणी सोडून संबंध खोर्‍याचे पुर्नभरण करण्यांत येईल.  शिवाय रब्बी उन्हाळ्या हंगामामध्ये संबंध खोर्‍यात पाणी फिरत असल्यामुळे भुईजल पातळीही फारशी खोल जाणार नाही.  स्वतंत्रपणे विहीर काढण्यास अप्रत्यक्षपणे उत्तेजन दिले जाणार आहे.  विहिरी जरी पाडल्या गेल्या तरी त्यामुळे धरणातील पाण्याच्या हक्कास बाधा येणार नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org