पाण्याचा पुरेपूर वापर :
जुने कालवे, चार्या, उपकालवे यांना सिमेंट काँक्रीटचे अस्तर लावलेले नाही. त्यामुळे यातून काही ठिकाणी थोडेफार पाणी झिरपते. शिवाय शेतकरी ऊसाकरिता १०-१२ इंच पाणी घेतो व भूसार क्षेत्रात वाफे न करताच पाणी सोडत असल्यामुळे तेथे पाण्याचा जास्त वापर होतो. हे सर्व पाणी जमिनीत मुरले जाते. त्यामुळे बारमाही क्षेत्रात विहिरी वाढल्या व त्यामुळे ऊस क्षेत्रेही वाढली. त्याचप्रमाणे पाझरचर, नाले व नद्या यावरील ऊसाच्या मंजुरीही वाढल्या. जमिनीत मुरणारे सर्व पाणी वर खेचून बागायत क्षेत्र वाढून लागले. याचा परिणाम मिरणा नदी मालेगांव जवळ, गोदावरी पुणतांब्याजवळ, प्रवरा लाखबंधार्याजवह व नीरा सरावीपुलाजवळ उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कोरड्या पडू लागल्या. समादेश क्षेत्रातील विहिरी इतक्या वाढल्या की त्यासुद्धा एप्रिल मे मध्ये कोरड्या पडू लागल्या व शेतकरी एप्रिल मे मध्ये कालव्याचे एक किंवा दोन पाणी विहिरीवरील ऊसास देण्याची मागणी करू लागले. तरीपण साखर कारखाने ब्लॉकवरील ऊसावर न चालता विहीर व नदीवरील उपसा सिंचनावरील उसावर चालतात असा मुद्दा दांडेकर-देऊसकर कमिटीने उचलून धरून कालवे दुहंगामी केले तरी साखर कारखान्यांवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही असेच मत प्रतिपादिले. पण वस्तुस्थिती तशी नाही.
आठमाही भाग :
साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर कालव्याच्या पुच्छ भागाकरिता कपाशी व भुईमूग याकरिता पाणी परवानगी देण्यात येत होती. रब्बी हंगामात पाऊस वेळेवर पडल्यावर पाण्याची गरज न भागल्यामुळे किंवा पाणी पुरवठा वक्तशीर होत नसल्यामुळे या भागातील बर्याच शेतकर्यांनी आपापले दुहंगामी ब्लॉक सरकार जमा करून पावसाने ताण दिला तरच नमुना नंबर-७ वर पाणी घेण्यास सुरुवात केली. या दुहंगामी भागात शेतकर्यांनी विहिरी खणून पाहिल्या पण पुरेसे पाणी न लागल्यामुळे बारमाही पिके तर सोडा पण जनावरांकरिता साधा घास कडवळ वगैरे करणे सुद्धा कठीण होऊ लागले. बर्याच वेळा पिण्यासाठी व जनावरांच्या चार्यासाठी उन्हाळ्यात २-३ वेळा तरी कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागण्या येऊ लागल्या.
नवीन आठमाही कालवा :
गेली ५०-६० वर्षे चालू असलेल्या व पावसाळ्यात व हिवाळ्यात पाणी खेळणार्या या आठमाही भागाची स्थिती तर नवीन होणार्या आठमाही कालव्याची स्थिती या भागापेक्षा काही निराळी होणार आहे अशातला भाग नाही. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा यातील काळ्या पाषाणाच्या थरामध्ये पाण्याचे साठे फारच कमी आहेत. चालू वर्षाच्या दुष्काळामध्ये बहुतेक सर्व ठिकाणी पिण्याच्या पाण्याकरिता बोअर विहिरी घेतल्या गेल्या आहेत. त्यातील जवळ-जवळ ६० टक्के विहिरींना पाणीच लागले नाही. तर ज्यांना पाणी लागले त्यामध्ये कायमचा पाणी पुरवठा करण्याइतका साठा उपलब्ध नाही असे ऐकिवात येते. बांधकाम चालू असलेल्या मोठ्या धरणांचे कालवे, उपकालवे व चार्या (लहान-मोठ्या) या सिमेंट काँक्रीटचे अस्तर लावून तयार केल्या जातात. अशा कालव्यांवर ऊस, फळबाग व घास या बारमाही पिकांना मंजुरी नसेल तर विहिरींना पाणी येणार कुठून ? आणि ही पिके जर केली नाहीत तर साखर कारखाने कसे उभे राहणार, फलोद्यान कसे फुलणार व दुग्ध व्यवसायाकरिता पाळणार्या जनावरांना उन्हाळ्यांत हिरवळ कोठून देणार ? तिथे भूगर्भामध्ये पिण्याच्या पाण्याकरिता लागणारा साठ उपलब्ध नाही तेथे शेतकर्यांनी विहिरी खणून त्यावर बसवून व तुषार पद्धतीने पिके करा असे सांगणे म्हणजे त्यांना दारिद्र्याच्या खड्ड्यात लोटण्यासारखे आहे.
गेल्या ४-६ वर्षात मधमेश्वर येथील उंचावणीच्या बंधार्याच्या फुगवट्यावर तसेच प्रवरेवर राजूरपासून ओझरपर्यंत नदीच्या पाण्यावर उपसा सिंचन करून एवढा ऊस झाला आहे की, धरणातून कालव्याकरिता नदीत सोडलेले पाणी पूर्णतया कालव्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. परिणामी दोन्हीही कालव्यावर पाण्याच्या पाळ्या लांबल्या व त्यांचा विहिरीवरील ऊसावरसुद्धा परिणाम झाला. त्यामुळे या कालव्यांच्या परिसरांमधले ३ साखर कारखाने बंद पडले आहेत. तर बाकीच्या साखर कारखान्यांनी पूरक कारखाने काढल्यामुळे त्यावर तग धरून आहेत.