महाराष्ट्रातील दुष्काळ - २६

विदर्भात सकृतदर्शनी पर्जन्यवृष्टी पश्चिम महाराष्ट्रापेक्षा बरी बसली तरी बागायती शेतीचा फारसा विस्तार झालेला नाही.  विदर्भातील एकूण शेती अर्थव्यवस्थाही अस्थिरतेच्या चक्रव्युहात सापडली आहे.  वरूर वगैरे संत्र्यांच्या बागा असलेल्या भागात भूगर्भातील पाण्याचाही तुटवडा भासू लागला आहे.  भूगर्भात पाणी मुरविणे, पाणी अडविणे आणि बागायती शेतीचा प्रचंड प्रमाणात विस्तार करणे व उत्पादकांना पैसा मिळेल अशी शेतीव्यवस्था व पीकपद्धती स्थिर करणे ही विदर्भातील शेतीपुढील मुख्य उद्दिष्टे असली पाहिजेत.  विदर्भातदेखील पाण्याच्या काटकसरीने व आधुनिक तंत्र-विज्ञानाचा - म्हणजे ठिबक पद्धतीचा उपयोग करूनच ही उद्दिष्टे साधता येतील आणि भावी काळात भूगर्भातील पाण्याची पातळी टिकविता येईल.

मराठवाड्याच्या पश्चिम भागाचे प्रश्न हे पश्चिम महाराष्ट्रासारखेच आहेत आणि पूर्व मराठवाड्यातील परिस्थिती विदर्भासारखीच आहे.  म्हणून येथे ही धोरणांची दिशा घेऊनच मराठवाड्यातील शेतीचे प्रश्न सोडविता येतील.

खाजगी जीवनात नीतिमूल्यांचा आधार घेऊन चालावे असे आपणास वाटत असते; तथापि योग्य धोरणांचे अवलंबन व अशा धोरणांची कार्यक्षमतेने अंमलबजावणी यावरच समाजाचा आर्थिक विकास अवलंबून असतो.  सामाजिक आणि सामुदायिक धोरणांची अंमलबजावणी करणारे अथवा त्यात पुढाकार घेणारी माणसे चांगली अथवा वाईटही असू शकतात.  जनतेच्या दृष्टीने समाजावर या धोरणांचा काय परिणाम झाला हे महत्त्वाचे असते.  आर्थिक क्षेत्रांत धोरणाचा परिणाम उत्पादनवाढीत होत असतो आणि उत्पादनवाढ ही प्रगतीला मदत करणारी क्रिया असते.

महाराष्ट्रात व भारतात दुसरा महत्त्वाचा प्रश्न हेक्टरी उत्पादन क्षमतेचा आहे.  भारताची हेक्टरी उत्पादनक्षमता चीनसारख्या आपल्या सारखीच विकासाची अवस्था असलेल्या देशापेक्षा कितीतरी कमी आहे.  उत्पादनक्षमतेचा प्रश्न सोडविल्याशिवाय महाराष्ट्रातील शेती ही आर्थिकदृष्ट्या परवडणारी बनणार नाही.  दुर्दैवाने ठिबक पद्धतीने नेमके पिकाच्या गरजेएवढेच पाणी देता येते आणि याचा परिणाम मात्र उत्पादनक्षमता वाढण्यात येतो.  हवाई बेटातील सुमारे ९० टक्के ऊस हल्ली ठिबक पद्धतीखाली आहे.  याचा यापूर्वीचा उल्लेख केलेला आहे. ठिबक पद्धतीमुळे सरासरी साखरेचा उतारा २२ टक्क्यांनी आणि उसाची हेक्टरी उत्पादनक्षमता २६ टक्क्यांनी वाढली आहे.  तथापि, ठिबक पद्धतीत उसाची उत्पादनक्षमता वाढविण्याचे प्रचंड सामर्थ्य आहे.  पूर्वी एक हेक्टर क्षेत्रातील उसापासून सुमारे २४ टन साखरेचे उत्पादन होत असे.  आता ठिबक पद्धतीचा उसाला पाणी देण्याचा अवलंब करण्यास हवाईत सुरवात झाल्यापासून ही सरासरी २९ टन साखर उत्पादनांवर पोचली आहे.  हवाईत १९८५ सालात ठिबक पद्धतीने पाणी दिलेल्या उसमळ्यांमधून सर्वाधिक साखरेचे उत्पादन - ४९ टन - हेक्टरी मिळाले.  हेक्टरी चाळीस टन साखर उत्पादन काढणारे तर अनेक ऊस मळेवाले हवाईत आहे.  जसजशी ठिबक पद्धतीच्या साहित्याच्या गुणत्तेत आणि ठिबक पद्धती साबविण्याच्या पद्धतींत सुधारणा होत आहेत, तसतशी हेक्टरी उत्पादनक्षमता सारखी वाढत जाणार आहे. 

काही अपवाद सोडल्यास ठिबक पद्धतीने पाणी दिल्यास उत्पादनक्षमता प्रचंड असा इझरायलमधील अनुभव आहे.  म्हणूनच इतक्या प्रतिकूल परिस्थितीत शेती उत्पादन करूनही इझरायल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढाओढीने शेतीमाल विकू शकतो.

ठिबक पद्धतीचा उपयोग करून टेकड्या अथवा डोंगरांच्या उतारावर अथवा उंचसखल जमिनीत सुद्धा बागायती शेती करणे शक्य झालेले आहे.  हवाईत टेकड्यांच्या उतारावर हजारो एकर बागायती अननसाची शेती हल्ली केली जाते.  ठिबक पद्धतीमुळे पाण्याची तर बचत होतेच परंतु रासायनिक खतेही पाण्याबरोबर रोपट्यांच्या मुळाजवळच जात असल्यामुळे वाया जात नाही.  परंपरागत पद्धतीने दिलेल्या खतापैकी सुमारे तीस-पस्तीस टक्के खते वाया जातात.  कारण ती प्रवाही पाण्याबरोबर रोपट्याची अथवा झाडाची मुळे नसतील तेथेही जातात.

ठिबक पद्धतीचे पाणी फक्त पिकांच्या मुळाजवळच थेंबथेंब पडत असल्यामुळे शेतीत गवत वाढण्यास फारसा वाव नसतो.  फळबागांनाही गवताचा उपद्रव कमी होतो, खारे पाणी असले तरी ठिबक पद्धतीचा अवलंब केल्यास पीक चांगले येऊ शकते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org