महाराष्ट्रातील दुष्काळ - १८

तथापि, भारतातील बहुतेक प्रदेशांत अद्यापही परंपरागत पीक पद्धतीच प्रचलित आहे.  वनशेती, वृक्षशेती, फळबागा यांच्या क्षेत्रांत वाढ करण्याची आणि अन्नधान्यास फारश्या योग्य नसलेल्या क्षेत्रांत ही व इतरही पिके लोकप्रिय करण्याची गरज आहे.  मका, बटाटा ही पिके ऊस, कापूस, ज्यूट सोयाबिन इत्यादी प्रमाणेच औद्योगिक सामर्थ्य असलेली पिके आहेत.  त्याचे क्षेत्र वाढविण्याची गरज आहे.  दुष्काळी भागांत कमी पाणी लागणार्‍या फळबागा व करडी हरभरा, तूर इत्यादी पिकांचे क्षेत्र प्रचंड प्रमाणात वाढविण्यास वाव आहे.  वर उल्लेख केलेल्या शेती उत्पादनाच्या कार्यक्रमांपैकी काही कार्यक्रम महाराष्ट्रातील शेती खाते राबवीतही आहे.  तथापि शेतीचे कार्यक्रम कितीही चांगल्या तर्‍हेने राबविले आणि भारतीय अर्थव्यवस्था ही उद्योगप्रधान बनविली नाही आणि शेतीवरील अवलंबून असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण क्रमशः कमी करण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून वाटचाल केली नाही, तर भारताला दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडणे अवघड आहे.

अलीकडे श्री. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर भारताच्या औद्योगिकीकरणाच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.  तथापि, पुन्हा देशातील राजकीय गुंतागुंतीमुळे केंद्र सरकार व राज्य सरकार सवंग लोकप्रियतेच्या घोषणा देऊन वाटचाल करू पाहात आहेत की काय अशी साधार भीती वाटू लागली आहे.  १९८६ सालानंतर अवलंबिलेल्या धोरणाचेही मूल्यमापन करून थोड्याफार दुरूस्त्या करता येतील, तथापि औद्योगिकीकरणाची गती कमी होईल असे काहीही करता कामा नये.  सवंग लोकप्रियतेच्या मार्गाने तर जाताच कामा नये.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(सोबत चर्चेसाठी अनेक महत्त्वाच्या लेखकांचे व विचारवंताचे, प्रशासकांचे व अर्थशास्त्रांच्या लिखाणांतील उतारे प्रस्तुतच्या चर्चेसाठी आवश्यक भाग म्हणून परिशिष्टांत जोडलेले आहेत.  हे उतारे लिखाणातही संदर्भ देऊन समाविष्ट करता आले असते.  पण ते मुद्दामच या टिपणांतील स्वतंत्र भाग म्हणून, परंतु या टिपणांतील अतिशय महत्त्वाचा भाग म्हणून समाविष्ट केलेले आहेत.  ते वाचकांनी जरूर पाहावेत.

यानंतरच्या भागात पाण्याचे व्यवस्थापनांतील अत्याधुनिक तंत्रविद्येची चर्चा तपशिलांत केली आहे.)

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org