महाराष्ट्रातील दुष्काळ - १६३

१३. दि. मा. चव्हाण

हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालय, बसवत

प्रश्न :  दुष्काळ निवारणासाठी लोकसंख्येला आळा घालणे आवश्यक आहे काय ?  लोकसंख्येला आळा घातला तर असलेली नैसर्गिक साधनसामुग्री ही भारतीय जनतेला पुरू शकेल आणि जनतेचे प्रश्न सुटू शकतील.  लोकसंख्येला आळा घालण्यासाठी कठोर उपाय योजना आवश्यक आहे असे वाटते.  चीनप्रमाणे एक कुटुंब व एक मूल अशी सक्तीची योजना राबवावी असे वाटते.  'दुष्काळ आणि पाणी' ह्या विषयाचा संबंध लोकसंख्येशी असल्यामुळे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमार्फत केंद्र शासनाला समान सक्तीच्या कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम राबविण्यासाठी शिफारस करावी.

उत्तर :  प्रा. चव्हाण ह्यांनी 'दुष्काळ आणि पाणी' ह्या संदर्भात लोकसंख्येचा प्रश्न उपस्थित केलेला आहे.  'दुष्काळ आणि पाणी' आणि लोकसंख्या ह्या प्रश्नांचा फार निकटचा संबंध आहे.  विशेषत: आजच्या आंतरराष्ट्रीय संदर्भात ह्या प्रश्नाला अधिक महत्त्व प्राप्‍त झाले आहे.  हल्ली जगातील २३ लोकसंख्या ही अप्रगत राष्ट्रात आहे.  ज्या राष्ट्रात दारिद्रय अधिक आहे, जेथील शेती आणि औद्योगिक उत्पादनाची पातळी ही समाधानकारक नाही अशाच राष्ट्रामध्ये जगातील वरील निर्देशित केलेली लोकसंख्या केंद्रित वाढ झाली आहे.

लोकसंख्येची १८ टक्के वाढ हल्ली ह्याच अप्रगत राष्ट्रांमध्ये होत आहे, आणि त्यामुळे सर्वच साधन सामुग्रीही कमी पडू लागली आहे.  शिबिरात जो प्रबंध सादर केला होता (पहा विभाग पहिला पृ. ३ ते ४७ त्यात दरडोई पाण्याची उपलब्धता अनेक राष्ट्रांच्या मानाने आपल्या देशात कशी व किती कमी आहे त्याची आकडेवारी दिली आहे.  पुढील ३० वर्षात, म्हणजे इ.स. २०२० मध्ये तर दरडोई पाण्याची उपलब्धता आणखी कमी होईल !  आणि महाराष्ट्राची दरडोई उपलब्धता तर देशातील अनेक राज्यांच्या तुलनेने बरीच कमी आहे.  आजच्या महाराष्ट्राच्या अनेक भागात नागरी गरजा, औद्योगिक गरजा आणि शेतीसाठी पाण्याची मागणी ह्यात संघर्ष निर्माण होऊ लागला आहे.  ह्याशिवाय, हे प्रश्न सोडविणे वाटते तितके सुलभही राहिलेले नाही.  प्रवरा आणि गोदावरीच्या खोर्‍यात तर पाण्याची उपलब्धता आणि पाण्याची मागणी ह्यातील तफावतीमुळे मोठी अरिष्टाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेतीवरही माणसांची गर्दी वाढू लागली आहे.  मूळतः भारत हा लहान शेतकर्‍यांचा देश आहे.  शेतीवरील लोकसंख्येचा बोझा गेल्या दोन शतकांपासून सारखा वाढतो आहे.  जगात औद्योगिक क्रांती झाल्यामुळे शेतीवरील बोझा कमी होण्यास हातभार जरी लागला असला तरी भारतात मात्र शेतीवरील बोझा प्रत्यक्षात वाढतानाच दिसतो आहे.  ह्याला अपवार आहेत पण ते अत्यल्प आहेत !

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org