महाराष्ट्रातील दुष्काळ - १५७

६.  अरविंद बाबूराव चव्हाण

वाई

प्रश्न :  ना. धों. महानोर यांच्या पळसखेडा गावाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात तशा प्रकारच्या योजना राबविणे शक्य आहे काय ?

उत्तर :  ह्या प्रश्नाचे सर्वसाधारण उत्तर द्यायचे म्हटल्यास ते होकारार्थी असेच द्यावे लागेल.

नद्यांची पात्रे किंवा ओढा, प्रवाह, ज्या लहानमोठ्या पाणलोटाच्या प्रदेशात येतात.  त्या सर्व प्रवाहांचा उपयोग पाणी अडविण्यासाठी आतापर्यंत जितक्या प्रमाणात करावयास पाहिजे होता, तितक्या प्रमाणात केला गेला नाही.  परंतु कवी श्री महानोर यांच्या प्रयोगामधून आडगाव येथील प्रकल्पातून किंवा महाराष्ट्र शासनाच्या पाणबोट विभागातर्फे राबवल्या जाणार्‍या सर्वकष योजनांच्यामुळे आता ह्या कार्यक्रमाला खूपच महत्त्व प्राप्‍त झाले आहे. मोठ्या धरणांवर अश अडविण्याच्या योजनांना लहान मोठ्या विभागात अधिक प्राधान्य दिले पाहिजे.  महत्त्वाचे म्हणजे ह्यात पैशांची गुंतवणूकही कमी असते.  उत्पादनवाढीच्या संदर्भात कमी कालखंडात फायदेही राष्ट्राला मिळू शकतात.  कवी महानोर यांच्या प्रयोगाचे ह्या दृष्टीने महत्त्व आहे.  (श्री विजय बोराडे व श्री गांधी ह्यांच्या आडगाव प्रकल्पांवरील श्री सतीश कामत यांचा ह्या ग्रंथात समाविष्ट केलेला लेख जरूर पाहावा.  आपणास योग्य वाटतील अशा सूचना संबंधितांना अवश्य कराव्यात.)  श्री. ना. धों. महानोर यांनी केलेल्या विविध शेती प्रयोगाबद्दल त्यांचा एक ग्रंथ पुण्यातील प्रेस्टिज प्रकाशनतर्फे प्रकाशित होत असल्याचे कळते.  त्याचाही आपण फायदा घ्यावा.

७. शिवाजीराव सखाराम मुजगुले

पोहेगाव, ता. कोपरगाव (जि. अहमदनगर)

प्रश्न :  पावसाचे नैसर्गिक पाणी जमिनीवर पाडण्यासाठी काही संशोधनात्मक प्रयत्‍न करणे फायद्याचे आहे काय ?  पावसाच्या दिवसात पाण्याचे ढग महाराष्ट्रावरून वाहात असतात.  त्यावेळी कृत्रिमरित्या उपाययोजना करून पाऊस पाडण्यासाठी येणारा खर्च व आता सरकार दुष्काळाला तोंड देताना संपूर्ण क्षेत्रात करीत असलेला खर्च ह्यातील फरक लक्षात घेता आणि ह्या धोरणाचे परिणाम पाहाता, कृत्रिम पाऊस पाडणे फायद्याचे आहे काय ?  'जर कृत्रिम पाऊस पाडणे' फायदेशीर नसेल तर तसे का याचा आकडेवारीने खुलासा करा.

उत्तर :  श्री. शिवाजीराव ह्यांनी विचारलेला प्रातिनिधिक प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहिलेला आढळतो.  तेव्हा प्रश्न विचारल्याबद्दल त्यांचे आभार मानतो.

कृत्रिम पद्धतीने पाऊस पाडण्याचे प्रयोग जगाच्या पाठीवर अद्याप कोठेही यशस्वी झालेले नाहीत.  ह्यासंबंधींचे सर्वाधिक प्रयोग अमेरिकेत झाले आहेत.  परंतु त्यात विशेष प्रगती झाली नाही.  श्री. मुजगुले ह्यानी जरी सद्‍भावाने प्रश्न विचारला असला तरी त्यांना वाटणारा ह्या विषयीचा आशावाद हा वास्तवतेत आणणे सध्यातरी अवघड आहे.  कृत्रिम पावसाच्या बाबतीत खर्चाची आकडेवारी तुलनात्मक अभ्यासासाठी अजून उपलब्ध नाही.

मी भारत सरकारमध्ये मंत्री असताना पावसाच्या ढगापासून कृत्रिम पद्धतीने पाऊस पाडता यावा म्हणून बिहारमध्ये काह  प्रयत्‍न केला होता.  कृषी मंत्रालयानेच ह्यात पुढाकार घेतला होता.  ह्याबाबत सरकारने रीतसर करार-मदार ही केले होते.  कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी एका अमेरिकन कंपनीला बरीच मोठी रक्कम दिली होती.  परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.  भारताचे पैसे मात्र वाया गेले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org