महाराष्ट्रातील दुष्काळ - १४३

पाणी समोर आहे परंतु ते वापरता येत नाही म्हणून डोंगरी परिसरातील चेहरे दुर्मुखलेले आणि तहानलेलेच राहात आले आहेत.  आता त्या डोंगरी परिसरातील आदिवासी शेतकरी ह्या धरणातील पाण्यातला आपला वाटा मागण्यासाठी आन्दोलन करण्यास उठला आहे.  त्याने रास्त भांडण सुरू केले आहे.  त्याने त्या धरणाचे पाणी 'फेर वाटप' पद्धतीने वाटले जावे हा आग्रह सुरू केला आहे.  मी ह्या शेतकर्‍यांची बाजू घेऊ इच्छितो.  वसंतदादा पाटील पाटबंधारे मंत्री असताना व मी समाजकल्याण मंत्री असताना, मी त्यांना माझ्या आदिवासी व दलित भूक्षेत्रात घेऊन गेलो.  आणि त्यांना आग्रहाने वास्तव परिस्थिती दाखवून, गोरगरिबांना पाण्याचा योग्य वाटा मिळावा असा आग्रह धरला.  हा आग्रह विशिष्ट तत्त्वावर आधारलेला होता.  त्यावेळी वसंतदादानी केवळ ऐकून घेतले एवढेच नव्हे तर, तत्काळ ५ टक्के पाणी लिफ्ट-उपसा-पद्धतीने घेण्याचा आदेशही दिला.

त्यानंतर शदर पवार ह्यांनीही आम्ही उपस्थित केलेल्या पाणी फेर वाटपाचा मुद्दा मान्य केला.  त्यांनीही शेतीच्या उगमापासून ते पाट कालव्यांपर्यंतच्या भागाभागातील शेतकर्‍यांना पाणी वाटून देण्याबाबतचा आग्रह धरला आहे.*  ह्यामुळे धरणाच्या पाण्यावरची भांडणे संपतील आणि ब्रिटिशांचे 'कमिटेड वॉटर' धोरण आता कालबाह्य ठरत आहे, ही आनंदाची बाब मानायला पाहिजे.  काही वक्त्यांनी केलेली टिका जिव्हारी लागणारी होती.  परंतु कधी कधी अशी टिका आवश्यक असते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

* अलीकडेच महाराष्ट्र राज्याने ह्या पाणी फेर वाटपाबाबत शासकीय अध्यादेश काढला आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ह्या आधी मी यशवंतरावांनी पाहिलेल्या स्वप्नांचा उल्लेख केला.  तशाच प्रकारची, शेतकर्‍यांच्या समृद्धीची स्वप्ने आमचे वसंतरावदादा, शरद पवार ह्या अग्रणी शेतकरी नेत्यांनीही पाहिली आहेत.  त्यामुळेच महाराष्ट्राच्या विधान भवनासमोर महात्मा फुले यांचा पुतळा उभा करून असा विश्वास जनतेला दिला गेला आहे की शेतीचे प्रश्न महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते सदोदित नजरे समोर ठेवत आहेत.  यशवंतरावांचे हे स्वप्न होते की महात्मा जोतिराव फुले ह्यांनी महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी शेतीची समृद्धी आवश्यक आहे, ह्याचे स्मरण सर्वांनी ठेवले पाहिजे आणि त्यांची आठवण ठेवून ग्रामीण प्रश्न सोडवले पाहिजेत.

स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रसभेच्या संस्थापन वर्षी पुण्यात भरलेल्या अधिवेशनाची संस्मरणीय ऐतिहासिक परंपरा ह्या निर्णयामागे आहे.  म. फुल्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते कुष्णराव भालेकरांनी राष्ट्रसभेच्या (काँग्रेसच्या) सभा मंडपासमोर गवताने साकारलेला शेतकर्‍याचा भव्य पुतळा उभा केला होता. शेतकर्‍याच्या अंगावर फाटलेली वस्त्रे चढवलेली होती.  हा पुतळा तेथे जमलेल्या प्रतिनिधींना सामान्य शेतकर्‍याची करूण कहाणी सांगत होता आणि प्रश्न विचारत होता.  'या देशाचा खरा प्रतिनिधी अजून 'राष्ट्र' सभेच्या मंडपाबाहेर आहे, हा शेतकरी म्हणजेच खरे 'राष्ट्र' आहे.  पण राष्ट्रसभेतून 'राष्ट्र' बाहेर आहे.'' महात्मा फुले ह्यांनी प्रतिकात्मक पद्धतीने व विदारक शब्दातून शेती समस्येचे राष्ट्रीय महत्त्व समाजासमोर कर्तव्य म्हणून उपस्थित केले.  शेतीप्रश्न हा फुले यांच्या पुतळ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय समस्यांचे एक सबळ प्रतीक बनून उभा राहिलेला आहे.  कै. यशवंतरावांच्या नावे सुरू झालेले हे प्रतिष्ठान, शेती प्रश्नाकडे हा ग्रामीण विकासाची गुरूकिल्ली असणारा प्रश्न म्हणून बघत आहे.  शेतकरी संघटनांना प्रिय असणारा दुष्काळ व पाणी हा प्रश्न प्रतिष्ठानने ह्यासाठी हाती घेतला आहे की ज्याची आठवण महात्मा फुले यांचा पुतळा खडसावून करून देत आहे.  कालपासून येथील चर्चेत ही गोष्ट स्पष्ट झाली की दुष्काळामुळे व दोषास्पद पाणी व्यवस्थापनेमुळे शेती व्यवसाय करणे कठीण झाले आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org