१६. इतर बाबींसाठी पैसे कसे आहेत शासनाकडे ?
ऍड. अशोक गजानन पाटील
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
धरण बांधण्यातला सरकारचा वेग १५ ते २० वर्षे एवढा आहे. तोपर्यंत दोन पिढ्या नाहीशा होणार नाहीत काय ?
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मा. अण्णासाहेब शिंदे यांचे भाषण मी ऐकले. पाणी प्रश्नाविषयी त्यांची मते स्पष्ट आहेत. त्यांना काळजी वाटते की लोकांना पाणी मिळत नाही. प्यायला पाणी मिळत नाही. शुद्ध पाणी मिळत नाही आणि सरकार आणि नियोजन काहीही करत नाही, असे हे एकूण दिसत आहे. परंतु माझ्या मते सरकार बिलकुल काहीही करत नाही असे नाही. कदाचित प्यायला पाणी मिळत नसेल पण महाराष्ट्रात मागेल त्याला भरपूर दारू मात्र मिळू शकेल ! ह्या बाबतीत सरकार गॅरंटी देईल. एकही मनुष्य तुम्हाला मिळणार नाही की त्याला दारू मिळाली नाही. जो मागेल त्याला मिळणार. आणि तीही शुद्ध स्वरूपांमध्ये.
भयानक अवस्था आहे आपल्या महाराष्ट्रात. हे बोलण्याची माझ्यावर पाळी आली आहे, कारण एक सामान्य मनुष्य आहे. खेडेगावातला एक सामान्य कार्यकर्ता. ज्या वेळेला मला विचारतो पाण्यासाठी पैसे नाहीत मग इतर कामासाठी कसे आहेत ? कारण त्याच्यामते मला अधिक कळते की, पाण्यासाठी आणि धरणांसाठी पैसे का नाहीत ? मी त्यांना सांगतो की; सरकारकडे पैशांची कमतरता आहे. त्यामुळेच धरणे बांधायला पैसे नाहीत. हे ऐकून तो मला कैचीत पकडतो. 'पैसे धरण बांधायला नाहीत. पैसे पाण्यासाठी नाहीत, मग पैसे दारूच्या कारखान्यासाठी कुठून येतात ?' निरूत्तर होतो की, दुःख होते मला. धरणांच्या बाबतीत जर विचार केला तर त्याहूनही वाईट अवस्था आज झालेली दिसत आहे.
धरणासाठी बुडणरी जमीन
परवा मुख्यमंत्री आले होते आमच्या सातारा जिल्ह्यांमध्ये. एका धरणाविषयी मागणी करण्यात आली की ते धरण बांधा. तर त्यांनी सांगितले की त्या धरणाच्या पाणी साठ्यांमुळे जर कुठली जमीन बुडणार नसेल, जर कुठली फॉरेस्ट लॅण्ड बुडणार नसेल तर धरण बांधण्यात येईल ! आता माझ्या मते सातारा जिल्ह्यांमध्ये एकही धरण असे नाही की ज्याच्यामध्ये फॉरेस्ट लॅण्ड बुडणार नाही. किंवा एखादे जंगल बुडणार नाही. अशा प्रकारची एकही जागा नाही. आम्ही याचा अर्थ असा लावायचा की आजपर्यंत आम्ही जी अपेक्षा धरून होतो की कधीकाळी ही धरणे पूर्ण होतील; आता तर जंगलांचा प्रश्न असा निर्माण होणार असेल, तर धरणे होणारच नाहीत, असा आम्ही अर्थ घ्यायचा का ? कुपया ह्या संबंधांमध्ये ज्यांना बोलण्याचा अधिकार आहे, त्यांनी या गोष्टींची नोंद घ्यावी. ही अत्यंत गैर आणि अव्यवहारी गोष्ट आहे. काहीतरी फॉरेस्टचा भाग बुडल्याशिवाय सातारा जिल्ह्यांमध्ये एकही धरण होणार नाही. मी सातारा जिल्ह्याचा आहे म्हणून मर्यादित प्रश्न मांडतो आहे. आणि धरणांसाठी काय आवश्यक असेल ते नियोजनांमध्ये किंवा तुमच्या तत्त्वप्रणालीमध्ये, तुमच्या त्या धरणांच्या शास्त्रांमध्ये आवश्यक असेल तो बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. मी सांगितले की धरणे झाली पाहिजेत आणि त्यामधील अडचणी दूर झाल्या पाहिजेत. त्या दुरुस्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. परंतु धरण बांधण्याच्या बाबतीतला सरकारचा वेग इतका भयानक हळू आहे की अगदी उद्या एखादे धरण बांधणे सुरू केले तर प्रत्यक्षात त्याचे पाणी मिळण्यासाठी किमान १५ ते २० वर्षाचा कालावधी लागेल. कुकडी धरणांचा अनुभव एका अधीक्षकाने सांगितला की १८-२० वर्ष झाली, परंतु अजूनही माणसाला वापरायला पाणी नाही ! धरणांचा प्रकल्प पूर्ण झालेला नाही, अशा अवस्थेमध्ये शेतीमध्ये काही प्रगती करावी अशी अपेक्षा धरून बसणार्या मनुष्याची उमेद खलास होते. तो कर्तृत्वहीन झालेला दिसतो. एक पिढी संपूर्ण बाद झालेली असेल त्यावेळी धरण पूर्ण झालेले असेल.