महाराष्ट्रातील दुष्काळ - ११८

आपल्याजवळ वीज उपलब्ध आहे.  तो वीज निर्मितीवरील खर्च हा पाणी उचलून इतरत्र उपलब्ध केल्यास निघू शकेल.  पिण्याच्या पाण्यासाठी आपण नेहमी स्वतंत्ररित्या खर्च करतो.  परंतु वरील प्रकल्पामुळे हा खर्च कमी होणे शक्य आहे असे मला वाटते.  आपण ह्या मुद्याला पाठिंबा द्यावा ही विनंती.

उपलब्ध पाणी काटकसरीने वापरले पाहिजे.  अण्णासाहेब शिंदे यांनी हा मुद्या आग्रहाने मांडलेला आहे.  ठिबक पद्धत असो, की आणखीन सिंचन पद्धत असो काटकसरीने पाणी वापरणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे.  पाणी आता पेट्रोलसारखे महाग झालेले आहे.  म्हणजे पेट्रोलसारखाच त्याचा काटकसरीने उपयोग केला पाहिजे.  हा महत्त्वाचा विचार आहे. अडवलेले पाणी असो अगर प्रवाही पद्धतीचे पाणी असो, पाण्याची किंमत सारखीच राहील, असे सरकारने सांगितले पाहिजे.  लिफ्टने येणारे पाणी १५०- रुपये हेक्टर दराने घ्यायचे आणि साधे प्रवाही पद्धतीचे पाणी २५- रुपये हेक्टरी दराने घ्यायचे असा फरक करण्यामुळे तर शेतकरी टिकणार नाहीत.

पाण्याचा प्रश्न म्हटला तर हजारो लोक जमा होतात.  पाण्यासाठी काय वाटेल ते तुम्ही करायला सांगा.  तेवढे सर्व करायची लोकांची तयारी आहे.  पाण्याच्या शेतीमधील वापराविषयी निरनिराळ्या लोकांनी वेगवेगळी मते मांडलेली आहेत.  त्यातील महत्त्वाची सूचना आहे की पावसाळ्यांमध्ये वाया जाणारे पाणी साचवून धरणे बांधणे अत्यंत महत्त्वाची गरज आहे.  असे पाणी साठवून धरायचे असेल तर पाटबंधारे अभियंत्यांनी एक सूचना केली असे सांगितले आहे की ही मोठमोठ्या धरणांमधून जिथे जिथे पाणी सांडते व पाणी वाया जाते तिथे तिथे धरणांच्या कडेकडेने एकेक कालवा काढावा.

त्या उंचीवरती एक पाट काढावा.  ते पाणी ज्यावेळी वाया जाऊ लागेल व वाहू लागेल त्यावेळी ते अशाप्रकारे साठवलेले पाणी भूगर्भामध्ये शिरेल व ते डोंगराच्या कडांमध्ये जाईल.  पाणी जमिनीत जिरेल.  ह्या पाण्याचा उपयोग विहिरींना होईल.  परंतु ते पाणी जिरायला पाहिजे.  कारण पाऊस पडतो त्यावेळी पिकांना पाण्याची गरज नसते.  जर आपले तलाव भरलेले असतील तर त्या पाण्यांचा आपण उपयोग तो काय करणार ?  म्हणून त्या पाण्याची साठवण केली पाहिजे.  ह्या सूचनेचा अर्थ असा की जेवढे जेवढे म्हणून तलाव आहेत, त्यासर्व तलावांना अशा तर्‍हेने बांध घालून सांडपाण्याची वाहावून नेण्याची, पाणी जिरवण्याची व फिरवण्याची व्यवस्था केली पाहिजे.

याच्याशी संबंधित एक नवीन मुद्दा मांडू इच्छितो.  दुष्काळी पट्टयांना पाणी पुरत नाही.  ढग दुष्काळी प्रदेशावरून पलीकडे जातात.  हे ढगांतील पाणी खाली जमिनीवर पाडणे शक्य करता येईल काय ?  हा तो विचार आहे.

दुष्काळी पट्ट्यामध्येही जिथे जिथे शक्य आहे तिथे पाऊस पडतो.  परंतु जिथे पाऊस मुळीही पडत नाही.  तिथे काय करावे ?  ह्या आधी वर्णन केल्याप्रमाणे वाया जाणारे पाणी आहे, ते कॉमन ग्रीड करून इकडचे पाणी तिकडे नेऊन दुष्काळी प्रदेशाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्‍न करावा.  विशेषतः पावसाळ्याचे पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था केली पाहिजे.  त्यामुळे पाण्याचा प्रश्न चांगल्या पद्धतीने सुटेल असे माझे मत आहे.  पाटबंधारे खात्यातील अधिकार्‍यांच्या दृष्टीने पाण्याची खूप उपलब्धता आहे.  बर्‍याच गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी असे सांगितले की पावसाळ्यामधले पाणी साठवून पाणी जिरवले की ६२ टक्के विहिरींना पाणी अधिक मिळेल.  अलीकडे शेतीसाठी पावसाच्या पाण्यापेक्षाही आपण विहिरीचेच पाणी शक्यतो वापरतो.  भूगर्भातून वाहाणारे पाणी अधिक मिळण्याच्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे.  आज जे उपलब्धतेनुसार पाणी आहे.  ते आपण नळ, स्प्रिंकल, ड्रिप ह्या पद्धतींनी देऊ.  परंतु बाकीचे जे पाणी आहे हे याच विशिष्ट पद्धतीने दिले गेले पाहिजे.  असो मी फक्त दुष्काळ आणि पाणी या विषयावरच बोलणार होतो.  नंतर मांडलेले बाकीचे मुद्दे मला मांडावयाचे नव्हते.  पण ते नंतर सुचत गेले.  परंतु बोलण्याच्या ओघात मी नवीन मुद्दे उपस्थित केलेत.  मला या ठिकाणी विचार मांडण्याची संधी देण्यात आली, त्याबद्दल मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे आणि मित्र मंडळींचे आभार मानतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org