महाराष्ट्रातील दुष्काळ - १०७

शेतकर्‍याला पाण्याचा वापर शिकवला पाहिजे

मी येथे एक संदर्भ मुद्दाम सांगू इच्छितो.  बारामती भागात १०० वर्षांपूर्वी १८८५ साली निरा कॅनॉल आला आणि १०० वर्षे गेल्या वर्षी पूर्ण झाली म्हणून त्यासंबंधी बरेच लिखाण प्रसिद्ध झाले.  सांगण्यासारखी एक गोष्ट म्हणजे जागतिक बँकेने फलटण आणि बारामती या भागातील पाण्याच्या वापराचा व तिथल्या समाजजीवनाचा आणि त्यांच्यावर काय परिणाम झाले ह्याचा, गेल्या शंभरवर्षांचा सविस्तर अभ्यास केला.  त्याचे सविस्तर लेखन माझ्या वाचनात आले.  जागतिक बँकेने लिहिले आहे की, १८८५ ते १९२० सालापर्यंत या कॅनॉलमधून जवळजवळ थेंबभरच पाण्याचा वापर शेतीसाठी केला जात होता.  पाण्याची थोडी पातळी वाढली म्हणून लोकांच्या जमिनी गेल्या हा इतिहास आहे.  त्यावेळेला पाणी वापरात कसे आणावे हे माहीत नव्हते म्हणून ब्रिटीश सरकारने सातत्याने पाणी-वापर-प्रचार मोहिमा काढल्या !  शेतकर्‍यांच्यात विश्वास निर्माण केला, त्यांना नवीन पिके सुचविली आणि अशाप्रकारे पाणी वापरून शेतकरी कसे उत्पादन वाढवू शकतो हा विश्वास शेतकर्‍यांत निर्माण केला.  तसेच अशा उत्पादनवाढीसाठी भांडवली गुंतवणुकीबाबतचे विविध प्रयत्‍न गेले ३०-३५ वर्षे सतत करावे लागले.  त्यामुळे आज कुठे त्याचा १०० टक्के वापर होतो आहे !  पण ज्या ठिकाणी पाणी नाही, तेथे पाण्याच्या वापराची पद्धत लोकांना माहीत ती कशी असेल ?

आज ग्रामीण महाराष्ट्रापुढे जे प्रश्न महत्त्वाचे आहेत त्यात पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे.  मग तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, किंवा शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल !  पाऊस चांगला पडला तर महाराष्ट्राचा चेहरा वेगळा दिसतो.  पावसाने १५ दिवसांवर ताण धरला तर महाराष्ट्राचा चेहरा आपल्याला वेगळा पहायला मिळतो.  पाऊस महाराष्ट्राला टाळून गेला तर महाराष्ट्रामध्ये सुतकी चेहरा आपल्याला घराघरातून दिसतो.  गेल्या अनेक वर्षाचा आपल्या सगळ्यांचा हा अनुभव आहे.  सातत्याने निसर्गाच्या लहरीपणावर आपल्याला अवलंबून रहाण्याचा प्रसंग येतो.  यातून मार्ग काढण्याच्या दृष्टीतून काही प्रयत्‍न करता येईल का, हा विचार आपल्याला प्रामुख्याने करायचा आहे.

आकाशातून पडलेल्या पावसाचा वापर आपण कितपत करू शकतो ?  भूगर्भातल्या पाण्याची पातळी हा महाराष्ट्रात दुसरा चिंतेचा विषय होऊन बसलेला आहे.  पडणारे थेंब अन थेंब पाणी जमिनीत मुरते की नाही, ते साठवले जाते आहे की नाही, नंतर बाहेर काढल्यानंतर त्याचा वापर आपण व्यवस्थितपणाने करतो मी नाही.  अशा प्रकारे हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे.

वीज व पाणी :  तारक की मारक

विद्युत मंडळाच्या कामाचा विस्तार महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये झाला.  त्याचा परिणाम पाण्याच्या साठ्यावरसुद्धा विरीत होतो आहे.  गेल्यावर्षी संपूर्ण देशामध्ये विद्युत् पंपाचा पुरवठा करणे किंवा शेती पंपांना विद्युत् पुरवठा करणे, ह्या बाबतीत भारतामध्ये महाराष्ट्र राज्य पहिले आले आहे.  एवढे प्रचंड औद्योगिक यश गतवर्षी महाराष्ट्राला लाभले आहे !  स्वतःची भांडवली गुंतवणूक कर्ज काढून शेतकरी विहीर काढतो, लिफ्ट उभी करतो, एवढे करूनही जर पाणी लागले नाही तर त्याचा धोका स्वीकारतो.  कर्ज व्याजासकट परतफेड करण्याची जबाबदारीही शेतकरी डोक्यावर घेतो.  आणि म्हणून त्या शेतकर्‍यालासुद्धा जमीन बागायत करण्यासाठी प्रोत्साहित करावे म्हणून विजेच्या दरामध्ये अतिशय सवलत देण्यासंबंधीचा निर्णय राज्याने घेतला आहे, शेतकर्‍यांना शंभर टक्के विद्युत पुरवठा करायची प्रक्रिया आपण सुरू केली. किती वीज वापरावी ह्यावरचे बंधन काढून टाकले आहे.  त्याचा परिणाम निश्चितपणे चांगला झाला.  पण ह्या परिणामाला एक दुसरी बाजूसुद्धा आहे.  ती बाजू अशी की एकदा पंप सुरू केल्यानंतर (इलेक्ट्रीक मोटर सुरू केल्यानंतर) मग ती मोटर किती चालते हा विचार करण्याचे जवळपास थांबवून टाकलेले आहे.  किंबहुना त्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका सर्वत्र आढळते.

त्याचा परिणाम हा झाला की प्रचंड शक्तीने भूगर्भातले पाणी बाहेर फेकले जात आहे.  २५ वर्षापूर्वी किंवा ५० वर्षापूर्वी विहिरीमधून किंवा नदीच्या एखाद्या डोहामधून तळ बघायला मिळत असे, त्याचे महत्वाचे कारण तळातल्या पाण्याचा उपसा रेड्याच्या पखालीतूनच होत असे.  किंवा मोटेवरून होत असे.  आता त्या मोटेच्या ठिकाणी ५ हॉर्स पॉवर, २५ हॉर्स पॉवर, किंवा शंभर हॉर्स पॉवरचा पंप बसला.  काही तासामध्ये त्या विहिरीचा किंवा डोहाचा तळ आपल्याला प्रत्यक्षपणाने बघायला मिळतोय.  त्याचे महत्वाचे कारण हे की, प्रचंड ताकदीने हे पाणी बाहेर काढले जाते आहे, आणि इतरत्र फेकले जाते आहे.  त्यामुळे भूगर्भाच्या पाण्याच्या साठ्यावर मर्यादा यायला लागली आहे.  त्याचे एकत्रित दुष्परिणाम आज आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालेत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org