लाख मोलाच्या हजारो जिवांचा येथे चिखल झाला. 'लाल' क्रांतीतही हिम-शुभ्र राहिलेली व्होल्गा या धुमाळीत लालीलाल झाली. शूरमर्दिनी भू-माता आरक्त बनली आणि नंतर रक्तलांच्छित होऊन काळीठिक्कर पडली. तिच्या आश्रयाला कोणी जीव-जिवाणू उरले नाही. जगाच्या पाठीवर अनेक कुरुक्षेत्रे घडली असतील, पण 'व्होल्गा'च्या काठावर जे घडले, त्याला इतिहासात तोड नाही. या भूमीवर काय घडले नाही? रक्ताचे सडे सांडले, हाडांची माती झाली. तेथे कोण कोणासाठी संपला, हा हिशेब निरर्थक आहे. जे घडले, त्यामुळे रक्तमांसाचा चिखल झाला. या चिखलात माणुसकी कुजून गेली. सजीवता उगवेनाशी झाली. पिढीच्या पिढी निराधार झाली. सारे सारे उदास, भकास, भयाण आणि भयंकर झाले. अखंड वाहणारी 'व्होल्गा' आजही त्या भीषण इतिहासाची साक्षी आहे. ध्वनिरूपाने ती हे निवेदन करते. मी हा ध्वनी ऐकला आहे.
दिनांक ३ सप्टेंबर, १९६४चा तो दिवस. सकाळी अकरा वाजता व्होल्गागार्डमध्ये पोहोचलो. टूरिस्ट हॉटेलमध्ये माझा मुक्काम होता. या शहराला एक नवा इतिहास लाभला आहे. इतिहासामुळे जशी काही शहरे नावारूपाला येतात, तशी काही शहरे इतिहासाला जन्म देतात आणि अमर बनतात. व्होल्गागार्ड हे त्यांपैकी एक आहे. हे शहर म्हणजे एक इतिहासग्रंथ आहे. कोणतेही पान उघडावे आणि वाचू लागावे. येथील एका दिवसाचा मुक्काम मी या इतिहासाचे आलोचन करण्यात घालविला.
ऐतिहासिक वास्तू पाहताना तिच्या ललाटावरील लेख वाचण्याचा मी प्रयत्न करतो. मानवमात्राच्या ललाटाप्रमाणे अशा वास्तूंच्या ललाटावरही सटवाई काही लिहून जात असली पाहिजे. तेथील माणसांच्या ललाटाप्रमाणे इतिहास घडतो, की वास्तूच्या ललाटाचा लेख माणसाला घडवितो, हे मला माहिती नाही. पण या दोन्हींचा काही तरी आंतरिक संबंध असला पाहिजे खास ! ऐतिहासिक वास्तूच्या छायेत मी जेव्हा जातो, तेव्हा तो वास्तु-पुरुष हसू लागतो. आनंदाने, भेसूरपणाने ! काळाचा पडदा बाजूला सारून, सोन्याच्या टाकाने लिहिलेला वैभवशाली इतिहास वाचताना त्याला आनंदाचे भरते येते; आणि मळलेली भाग्यरेखा दाखविताना तो भेसूर हसतो. तो सांगतो, रत्नजडित सिंहासनावर आरूढ झालेला मी - आज हा असा आहे - पडलेला, पिचलेला, जळमटलेला ! ते पाहताना अंत:करण विदीर्ण होते.
व्होल्गाच्या किना-यावरील इतिहास पाहण्यापूर्वी स्मारकांच्या दुर्दशेचा इतिहास मनात डोकावून गेला. लढाईचे स्मारक म्हणजे सैनिकांच्या नावाने उभारलेला एक दगडी खांब ! कशाला तो पाहायचा? स्मारकाची ही अनामिक 'दगडी' कल्पना कोणी शोधून काढली असेल, ती असो ! एका दगडाने दुस-या दगडाचे स्मारक उभारले आहे, एवढाच बोध त्यातून मला होतो. लाख लाख माणसे देशासाठी आपला लाख मोलाचा जीव घालवितात आणि मागे उरलेले जे कोणी, ते एक दगड उभारून त्या शूराची नावेही घालवितात - वाटते, अशी स्मारके पाहूच नये !