परदेशांत भारतीय-हिंदी-समाज हा अभ्यासाचा वेगळा विषय आहे, असे मला वाटते. दुनियेच्या पाठीवरील वेगवेगळ्या देशांत, भारताच्या वेगवेगळ्या भागांतील जे लोक पोहोचले आहेत, त्यांच्या जाण्याचे आणि तेथील कामाचे स्वरूप हे वेगळे आहे. शे-दीडशे वर्षांपूर्वी मजूर म्हणून, गुलाम म्हणून जे गेले, त्यांच्यातील पुष्कळ लोक आता तेथे व्यवसायामध्ये स्थिर झाले आहेत. ते गेले, त्या वेळच्या राज्यव्यवस्थाही आता बदलल्या आहेत. अनेक राष्ट्रे स्वतंत्र झाली आहेत. या भारतीयांचा त्यांच्या मूळ भाषेचा संबंध तुटला असला, तरी त्यांना पूर्वजांची आठवण कायम आहे. मात्र बाहेर असलेल्या सर्वच भारतीयांना एकाच साच्यात बसविता येईल, अशी परिस्थिती नाही.
इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, कॅरेबियन सी मधील त्रिनिदाद, गियाना, सुरीनाम, मॉरिशस, मलेशिया, जमेका या देशांतून भारतीय मोठ्या संख्येने आहेत. दुनियेतील आफ्रिका, फ्रान्स, जपान, मध्यपूर्वेतील देश, सागरी बेटे येथेही भारतीय लोक पोहोचलेले आहेत. परंतु त्यांतील प्रत्येक ठिकाणची परिस्थिती, प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे परदेशांतील भारतीयांचा एकत्रितपणे, त्यांना एका साच्यात ठेवून विचार करता येणार नाही. अमेरिकेतील आधुनिक भारतीय हा वेगळा आहे. कोणी तेथे उच्च शिक्षणासाठी गेलेले आहेत, तर कोणी भारतात उच्च शिक्षण पूर्ण करून नोकरी-व्यवसायानिमित्त पोहोचला आहे. आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा तेथे निरनिराळ्या क्षेत्रांत उपयोग आहे, म्हणून कोणी राहिलेले आहेत, तर अनेक जण आर्थिक दृष्ट्या सोयिस्कर म्हणून स्थायिक झाले आहेत. अनेकांनी तेथील नागरिकत्व स्वीकारले आहे. ही मंडळी भारताकडे परत येणार आहेत, की पिढ्यान् पिढ्या तेथेच राहणार आहेत, हा एक प्रश्नच आहे.
कॅरेबियन सी मधील त्रिनिदाद, गियाना, सुरीनाम, मॉरिशस, मलेशिया येथेही मोठ्या संख्येने भारतीय आहेत. हे देश आता स्वतंत्र झालेले आहेत. गियानामध्ये हिंदी समाज म्हणून स्वतंत्र संस्था आहे. गियानामध्ये मी गेलो, तेव्हा या सर्वांना भेटलो. मंडळाचा म्हणून स्वतंत्र असा कार्यक्रम होण्याची गरजच नव्हती. मी ज्या ठिकाणी गेलो होतो, तेथेही भारतीयांचा स्वतंत्र असा कार्यक्रम आयोजित केलेला नव्हता. पण बहुसंख्येने भारतीय होते. जमेकामध्येही असेच घडले. जमेकामधील भारतीयांनी महामंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांच्या स्वागतासाठी एक समारंभ केला. त्यानंतर मी तेथे असताना स्वतंत्रपणेही त्यांनी मला बोलाविले. जमेकामध्ये भारतीयांची संख्या आठ-दहा हजारांच्या आसपास असावी. यांतील काही जुने आहेत, काही नव्याने पोहोचले आहेत. कोणी नोकरीसाठी गेलेले आहेत, तर कोणास यूनोच्या कामासाठी पाठविण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील दबडघाव, वैद्य अशी अलीकडेच गेलेली काही कुटुंबेही तेथे भेटली.
बरीचशी माणसे पिढ्यान् पिढ्या तेथे राहत असून त्या त्या देशाच्या वातावरणाशी पोषक अशीच त्यांची वागणूक आहे. त्यांचे आणि भारतात राहणा-या भारतीयांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. येथील काही मतभेद तेथेही पोहोचतात, त्यामुळे काही गुंतागुंती निर्माण होतात, हे खरे; पण त्यांच्या प्रश्नांची आणि येथील प्रश्नांची तुलनाच होऊ शकत नाही.